महार - मातंग


गुरुवार, ९ मे, २०१९

महार - मातंग

देशभरात सर्वात मोठी अनुसूचित जातं कोणती असेल तर ती आहे चर्मकार (चांभार) ही जात. पण महाराष्ट्रात ही जात अल्पसंख्याक आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठी अनुसूचित जात ही महार आहे तर त्याहून दुसऱ्या नंबरची लोकसंख्या असलेली जात मातंग आहे. चर्मकारांप्रमाणे महार आणि मातंग सुद्धा अनेक राज्यात आढळतात.

भारतात अनुसूचित जातीची लोकसंख्या नोंदली गेलेली १७% आहे. पण अनेक जातीत तो विभागला आहे. महाराष्ट्रात ५९ जाती या अनुसूचित जातीत येतात. मागील काही घटनांवरून (भारत बंद) आरक्षण अट्रोसिटी या किमान मुद्द्यावर यातील बहुसंख्य जाती एकत्र येतात असे दिसून येते. आंबेडकर हे एक सामायिक प्रतीक या जातींना जोडण्याच काम करते. हे घटक एकत्र राहिले तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्यांचा संविधान बदलण्याचा अजेंडा आहे. तो ते पूर्ण करू शकत नाहीत. म्हणून आंबेडकरांना रिप्लेस म्हणून प्रत्येक जातीच प्रतीक वेगळे असावं कोणत्याही जाती जोडल्या जाणार नाही याची काळजी rss घेताना दिसतं. हेच नव्हे तर प्रत्येक राज्यात दोन मोठ्या जातींना परस्परविरोधी बनवण्याचं काम rss पद्धतशीरपणे करत आहे. जाटव विरुद्ध वाल्मिकी, माला विरुद्ध मदिगा, महार विरुद्ध मातंग कशी भांडण लागतील व अनुसूचित जातीची ताकत निम्मी कशी होईल ही त्यांची रणनीती आहे. या संघर्षामुळे स्वाभाविक एक वर्ग आंबेडकरवादी बनला तर त्याच्या विरुद्ध वर्ग हिंदुत्ववादी बनतो व याचा फायदा संघाला त्यांचं "रामराज्य" बनवण्यासाठी होतो.
महाराष्ट्रात महार हे आंबेडकरवादकडे झुकलेले आहेत त्यामुळे यांचे विरुद्ध बहुतांश मातंग संघात सामील झालेले दिसून येतात. पण हा वाद rss निर्माण करण्यात यशस्वी ठरली कारण मुळातच या समाजामध्ये प्राचीन काळापासून आर्थिक कारणासाठी का असेना संघर्ष पहिल्यापासून असताना दिसतो तो आज आरक्षण वर्गीकरण या वादापर्यंत आलेला आहे. आर्थिक संघर्ष जरी असला तरी ऐतिहासिक दृष्ट्या हे दोन्ही समाज एकवंशीय असल्याचे दिसते.

महार मांग एक वंशाचे - महार मातंग हे एकाच वंशाचे असल्याचे दाखले काही मातंग समाजात रूढ असलेल्या कथेत पाहायला मिळतात

मांग हे जांब ऋषीचे वंशज. जांबऋषीला सात मुले. त्यातील सर्वात मोठया मुलाने भगवान शिवाच्या कामधेनूला जीवे मारले. आणि तिचे मांस खाल्ले. त्यावेळी जांब ऋषीचा सर्वात लहान मुलगा हा त्याच्या शेजारी उभा होता त्यामुळे रक्ताचे काही थेंब त्याच्या अंगावर उडाले. काम धेनूच्या वधाचा आरोप दोन्ही मुलांवर आला. भगवान शिवाने दोघांनाही श्राप दिला. शिवाच्या श्रापामुळे मोठा मुलगा महार झाला आणि लहान मांग झाला. ही कथा डक्कलवारांच्या जातीपुराणातील आहे.

कथा जरी काल्पनिक असली तरी महार मांग एकवंशाचे आहेत हे यावरून सिद्ध होते.

महार मांग एका संस्कृतीचे -

महार आणि मांग यांच कुलदैवत समान आहे त्यामुळे अनेक परंपरा समान आहेत. मरीआई (मातंगी) ही देवता महार मातंग दोन्ही समाज एकेकाळी पूजत होता. आज बहुतांश महारांनी व काही प्रमाणात मांगांनी बौद्ध धर्म स्वीकारल्या मुळे त्यांनी ह्या परंपरा सोडल्या आहेत.

या मरीआई (मातंगी) देवतेसंबंधी संशोधक रा. चि. ढेरे यांनी पुढील मत मांडले आहे -

मरीआई ही महारांची मुख्य देवता दक्षिणेतील आदिम मातृदेवता पैकी एक असून .....ती जिथे जिथे मातंगी या नावाने नांदते आहे. तिथे तिथे तिचे पुजारी हे महारच (क्वचित मांगही) आहेत. ....अनेकदा गौरवाने लक्ष्मीआई संबोधली जाणारी महाराष्ट्रातील मरीआई ही मातंगीच आहे. ...माहूर क्षेत्राची अधिष्ठात्री देवता जी रेणुका , तिला मातंगी देवी (आणि मेसको व मायराणी) अशी पर्याय नामे आहेत.

आता वरील उताऱ्यावरून मरीआई (महार आई) व मातंगी ही एकाच देवीची नाव आहेत. स्वाभाविक महार आणि मांग वांशिक व सांस्कृतिक दृष्ट्या भिन्न नाहीत.

मांग समाज कोलवंशीय आहे. हे सर्व संशोधकांनी मांडलेलं आहे. म्हणजेच मांग कोलीय या गणाचे लोक होते. तर महार मल्ल (माल -महाल-महार) या गणाचे. एका गणात १०० संख्या वाढली की गण विभाजित होत असे तसेच येथे पहायला मिळते. मल्ल चा मूळ अर्थ सुद्धा नावाडी आहे व कोलीय सुद्धा नावाडी मच्छीमार व्यवसाय (शेती) संबधित कार्य करणारे. म्हणजे हे गण सुद्धा नंतर अलग झाले असले तरी ते एकच होते. म्हणून मातंगाची जी कुलदेवी आहे तीच महारांची आहे.

मांग महार बौद्धसंस्कृतीचे -

मल्ल (महार) व मांग(कोल गणिय) ह्यांची कुलदैवत महाराई व मातंगी कोलगनिय महामाया आहे हे स्पष्ट आहे. गजलक्ष्मी जी सांची भरहुत च्या स्तुपावर प्रतिकृती पाहायला मिळते ती मातंगी महामायाच आहे. गजलक्ष्मी हे बुद्ध जन्माचं प्रतीक आहे. मातंग या शब्दाचा अर्थ देखील हत्ती असा आहे. महामायेच्या स्वप्नात पोटात हत्ती शिरताना दाखवणं हे बुद्धाच कुलचिन्ह हत्ती असल्याचे स्पष्ट करते.

अस्पृश्य हे बौद्धधर्माचे -
अस्पृश्यता अभक्ष भक्षण (गाईचं मांस खाल्ल्यामुळे) केल्यामुळे लागत असली तरी अस्पृश्यता. हे बौद्ध धर्माच्या विरोधात ब्राह्मणी धर्माची प्रतिक्रांती होती. अस्पृश्य बौद्ध होते म्हणून त्याचा द्वेष ब्राह्मणी धर्मातील लोक करीत. स्वाभाविक वेगळ्या धर्माचे असल्यामुळे धर्मात बंदी आणल्यानंतरही अस्पृश्यानी अभक्ष भक्षण (एकवेळ वैदिक करत होते ते) ते चालूच ठेवले. या उलट अस्पृश्य बौद्ध धर्माचे असल्यामुळे त्यांना कोणत्याही मंदिरात जाण्यास बंदी होती. कारण त्यांचा धर्म वेगळा होता त्यांचे दैव वेगळे होते.

आरक्षण वर्गीकरण -

महाराष्ट्रात अनुसूचित जातीची लोकसंख्या १६-१७% आहे. त्यातील निव्वळ महार ज्यांची नोंद आहे व बौद्ध ज्यांची नोंद आहे ते एकूण १२% आहेत. उरलेले ५% अनुसूचित जातीतील इतर ५८ जाती येतात. त्यात बहुसंख्य मांग (मातंग) व खालोखाल चर्मकार (चांभार) समाज आहे. आरक्षणाचा लाभ हा महार समाज अधिक घेतो असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील मातंग पुढारी नेहमी करत असतात. अर्थात दोन समाजात भांडणे व्हावी व त्यांचा प्रत्येक राज्यातील असलेल्या अजेंड्याप्रमाणे येथेही वाद घडावे असा त्यांचा मानस असतो. तरीही काही प्रमाणात का होईना मातंग समाजात आरक्षण वर्गीकरणाची मागणी थोडी फार होत आहे. पण यामागणीमुळे मातंग समाजाचा फायदा होणार की नुकसान हे अजून पर्यंत तरी मातंग पुढाऱ्यानी लक्षात घेतलेल नाही. महारानी आरक्षणाचा फायदा लोकसंख्येच्या वर घेतला हा आरोपही चुकीचा आहे असा निष्कर्ष सुखदेव थोरात यांनी मांडलेल्या अभ्यासपूर्ण लेखातून लक्षात येतो.

आता आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या मागणीच्या फायद्या तोट्याकडे आपण वळूया.

महाराष्ट्रात अनुसूचित जातीची लोकसंख्या २०११ च्या लोकसंख्येनुसार १६% आहे. बौद्ध व महार यांची एकूण लोकसंख्या १.५ कोटीच्या जवळपास आहे. मातंग समाजाची लोकसंख्या जवळपास २५ लाख इतकी आहे. चर्मकार समाज १३ लाख आहे. इतर १४ लाख.

आता अनुसूचित जातीच वर्गीकरण करायचं म्हटलं तर समजा. चर्मकार समजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिल तर मातंग समाज त्याच्या दुप्पट म्हणून त्यांना त्याप्रमाणात आरक्षण द्यावं लागेल. महार मातंग समाजाच्या सहा पट म्हणून त्याप्रमाणात आरक्षण द्यावं लागेल.

समजा १% आरक्षण चर्मकार समाजाला मिळालं तर दोन टक्के मातंग समाजाला मिळेल. व महारांना १२% द्यावं लागेल इतरांनाही चर्मकार समाजा एवढी लोकसंख्या आहे म्हणून १% द्यावं लागेल. आता जर त्याची बेरीज केली तर आरक्षण १% + २% + १२% + १% = १६% होईल. पण राज्यात तर आरक्षण आहे १३% मग आरक्षण वर्गीकरण केलं तर १.५% सुद्धा आरक्षण मातंग समाजाला मिळणार नाही. आरक्षण वर्गीकरण केल्यामुळे मातंग, चर्मकार, इतर अनुसूचित जातीचच नुकसान होणार आहे. कारण ९-१०% आरक्षण फक्त महार या समाजपुरता राखीव राहिल त्यामुळे त्यांच्या जागा सेक्युर होतील. इतर जातींना ३% मध्ये समाधान मानावे लागेल व नन्तर खुल्या वर्गातून जावे लागेल.

ह्याच आरक्षण वर्गीकरणचा फटका या आधी ओबीसी वर्गातील वंजारी समूहाला बसला आहे. २७ % ओबीसी आरक्षण सोडून आता वर्गीकरण मुळे वंजारी समाजाला फक्त २% आरक्षण मिळते. आता त्यांची मागणी पुन्हा ओबीसीत येण्याची आहे.    


अशीच गत मातंग समाजाची rss च्या मातंग पुढाऱ्यामुळे होऊ नये अशाच शुभेच्छा फक्त देता येऊ शकतील. भविष्यात चुकीच्या गोष्टींमुळे अनुसूचित जातीत फूट पडू नये हीच आशा व्यक्त करून मी थांबतो. 










1 टिप्पणी:

  1. काल्पनिक तुंभाड रचलेला मन मानेल तसे लिहलेले आणि अक्षरशः सामाजिक विष पेरलेले लेखन आणि या लेखनातून वक्तव्य आणि प्रवृत्ती तयार होत आहे.लोकशाही नव्हे विखारी आरक्षण पंगू जात शाही आहे देशात. समता.न्याय . बंधुता या गोष्टी असे विखारी जातीयवादी स्वार्थी लोक कधीच येऊ देणार नाहीत. आरएसएस असले धंदे करत नाही. कधीतरी एकात्म विचार करा तरच सत्तेवर बसता येते हा पूर्ण जगातील इतिहास आहे. विखारी प्रवर्त्ती ने मिळालेली सत्ता क्षणिक मिळते तर सर्वांना सोबत घेऊन मानव कल्याण साठी मिळवलेली सत्ता गेली तरी लोकांच्या स्मरणात राहते.असा काल्पनिक विखारी प्रचार थांबावा आणि खरोखर मानव कल्याणासाठी महत्व द्या.

Comments

Popular posts from this blog

१.महार

महार

भंडारी समाजाचा इतिहास