Skip to main content

प्राचीन भारताचा इतिहास - भाग २

प्राचीन भारताचा इतिहास - भाग २

आर्य हे भारताबाहेरून येथे आले हे आपण पाहिलंच. पण याचा अर्थ दास (अनार्य) हे मुलानिवासीवादी ठरतात असा होत नाही. नाग सुद्धा भारताबाहेरून आले असण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. यात फरक फक्त हा आहे कि नाग हे आर्यांच्या अगोदर भारतात आले असावेत.

कोसंबी दासांबद्दल म्हणतात :- दास हे सुमेरियनांपैकी असणेहि संभवनीय आहे. युफ्रेतीस आणि तैग्रीस नद्यांच्या मुखाजवळ सुमेरियन लोकांनी वसाहती केल्यानंतर काही काळाने त्यांच्यातीलच ह्या दास लोकांनी सप्तसिंधु देशात वसाहती केल्या असाव्यात
(हिंदी संस्कृती आणि अहिंसा, p.11)

आर्यांत फार पूर्वीपासूनच यज्ञ संस्था होती असे वाटत नाही. वेदांचे तीन विभाग पडतात. एक प्रार्थना विभाग , दुसरा गान विभाग व तिसरा यज्ञ विभाग. ऋग्वेद आणि अथर्ववेद प्रार्थना विभाग, सामवेद गान विभाग आणि यजुर्वेद हा यज्ञाशी संबंधित आहे. जेव्हा यज्ञ संस्था निर्माण झाली तेव्हा या प्रार्थना यज्ञातील मंत्र बनले.

डॉ. आ.ह.साळुंखे म्हणतात त्रिवेदांचे मंत्र हे मुळचे देवतांच्या प्रार्थना या स्वरूपात रचले गेले. नंतर ते यज्ञकर्माशी कृत्रिमरित्या जोडण्यात आले.
(आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल, p. 72)

आर्य लोकात सुरुवातीपासूनच मूर्तीपूजा नव्हती असे अनेक विद्वानांच मत आहे. त्यात मॅक्समुलेर, एच.एस.विल्सन, मॅक्डोनेल, डॉ.काणे, जितेंद्रनाथ बॅनर्जी, हि विद्वान मंडळी आहेत. तर बोलेंसन व वेंकटेश्वर वैगेरे लोकांची मते या विरुद्ध आहेत.

आता आपण वैदिक वाङ्मयात मूर्ती संबंधी काही उल्लेख आहेत का ते पाहूया

" ऋग्वेदात २.३९.९ मध्ये रुद्राच्या रंगीत मूर्तीचे वर्णन आढळते

तैतरिय ब्राह्मणात २.६.१७ मध्ये भारती, इडा आणि सरस्वती यांच्या सुवर्ण प्रतिमांचा उल्लेख आढळतो.

ऋग्वेदात ४.२४.१० मध्ये इंद्राला विकत घेण्याचा व विकण्याचा उल्लेख आहे. कोसंबी याचा अर्थ असा लावतात कि कारागीर लोक मोठमोठाले इंद्र करून इंद्र लिलेच्या वेळी भाड्याने देत व लीला संपल्यावर पुन्हा त्या इंद्राच्या मूर्ती दुसऱ्या वर्षासाठी जपून ठेवीत.
(हिंदी संस्कृती आणि अहिंसा, p.17)

ब्राह्मण आणि आरण्यकांचे खिल अंश आणि गृह्यसूत्रात देवप्रतिमा, मंदिर वैगैरेंचे उल्लेख आहेत. पंचविश किंवा तांडय ब्राह्मणात देव प्रतिमांचे नाचणे, रडणे, हसणे, थुंकणे आदी क्रिया अपशकुन मानल्या गेलेल्या आहेत.
(१०.५ - देवायतन कंपते, देवप्रतिमा हसन्ति, रुदन्ति, नृत्यन्ति, स्फूटन्ति....)

पारस्कर गृह्यसूत्रात २०.१.३ असे विधान आहेकी रथात बसून स्नातक देव प्रतिमेकडे जात असला तर तेथे पोहोचण्याच्या आगोदरच त्याने रथाचा त्याग करावा.

आपस्तंभ गुह्यसूत्रात ७.२० ईशान, मिढुशी आणि जयंत या देवतांच्या मूर्तींचे उल्लेख आहेत"

(भारतीय मूर्तिशास्र - डॉ. पु.नी. जोशी/ मूर्तीविज्ञान - ग.ह.खरे)

"अग्नी, सूर्य, पाणी, ब्राह्मण, गाय, आणि देवळाचे दार यांच्याकडे शक्यतो पाय पसरू नयेत - आपस्तंभ धर्मसूत्र (१.३०.२५)

वायू, अग्नी, ब्राह्मण, सूर्य, पाणी, देवतांच्या मूर्ती, आणि गायी यांच्या दिशेने पाय पसरू नयेत - गौतम धर्मसूत्र (१.९.१४)

अग्नी, सूर्य, पाणी, ब्राह्मण, गाय आणि देवता यांच्या दिशेने मूत्र व मल यांचे विसर्जन करू नये - आपस्तंभ धर्मसूत्र (१.३०.२३)

वायू, अग्नी, ब्राह्मण, सूर्य, पाणी देवतांच्या मूर्ती आणि गायी यांच्या दिशेने वा त्यांच्याकडे पाहत मूत्र व मल यांचे विसर्जन करू नये तसेच अपवित्र पदार्थ फेकू नयेत - गौतम धर्मसूत्र (१.९.१३)"

(वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी - डॉ. आ. ह. साळुंखे)

मनुस्मृती मध्ये देवतेंचे पूजन, तिची छाया, तीस घालावयाची प्रदक्षिणा, तिचे सानिध्य, तिचे देऊळ, तिचा भंग इत्यादींचा उल्लेख आला आहे.
(मूर्तीविज्ञान - ग. ह. खरे)

धर्मानंद कोसंबी, ग.ह.खरे, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. पु. नी. जोशी यांनी दिलेल्या संदर्भावरून एकेकाळी आर्यात मूर्तीपूजा अस्तित्वात होती असे वाटते. ग.ह. खरे देखील प्राचीन आर्याना स्पष्टपणे मूर्तिपूजक ठरवतात. डॉ. आ.ह. साळुंखे देखील यज्ञ संस्था सुरु होण्यापूर्वी त्रिवेद प्रार्थनेच्या स्वरूपात होते हे स्पष्ट करतात. याचा अर्थ प्राचीन आर्यात मूर्तीपूजा अस्तित्वात होती. नंतर मात्र त्यातला एक वर्ग यज्ञ कर्मकांडाकडे  वळाला. यज्ञ धर्माकडे वळत असताना त्यांना प्रतिमा पूजनाचा निषेध करण गरजेचं होत. तसा त्यांनी तो यजुर्वेदात (यजुर्वेद हा यज्ञ संबधी ग्रंथ आहे.) केला आहे.

इस्लाम चा जन्महोण्यापूर्वी पूर्व लोकात मूर्तीपूजा होती. व इस्लाम धर्माची स्थापना झाल्यानंतर त्यांना मूर्तीपूजेचा निषेध करावा लागला.

तसाच आर्यातील एक गट यज्ञ संस्थेकडे वळला व त्यांना मूर्तीपूजेचा निषेध करावा लागला. अस असले तरी सर्व आर्य यज्ञाकडे वळले नाहीत त्यातले काही ब्रह्मधर्माकडे (ज्ञानकाण्ड) वळले व काही मूर्तिपूजकच राहिले.

जोतिप्रसाद जैन आपल्या भारतीय इतिहास एक दृश्य या पुस्तकात म्हणतात
"जैन अनुश्रुती वरून दिसून येते कि दहावे तीर्थांकार शितलनाथाच्या नंतरच्या काळात ब्राह्मणांनी श्रमण परंपरेशी आपला विच्छेद करून आपली पृथक ब्राह्मण संस्कृती अथवा वैदिक धर्माला जन्म दिला"

यावरूनहि हेच सिद्ध होते कि यज्ञ कर्मकांड आर्यातील एका वर्गाने नंतरच्या काळात सुरु केली आहे.

शुद्र हे क्षत्रियांचा भाग होते (कौटिल्य शूद्राना आर्य म्हणतो. हरिवंशात शूद्राना द्विज म्हटले आहे. मनुस्मृतीत १०.४५ मध्ये शुद्र हे आर्य आहेत असे सूचित होणारे संदर्भ आहेत.) तो पर्यंत त्यांचे वेदातील चांगले उल्लेख होते. जशी शुद्रांवर बंधने लादली गेली तसे त्यांचे हे चांगले उल्लेख वैदिक वाङ्मयातून वगळण्यात आले. फक्त माहाभारताच्या शांतीपर्वात शूद्राशी संबंधित चांगला उल्लेख पाहायला मिळतो ह्या पुराव्यावरून डॉ. आंबेडकरांनी शुद्र पूर्वी कोण होते ? हा ग्रंथ लिहिला.

शुद्रांच्या बाबतीत वैदिकांनी जी काळजी घेतली ती मूर्तीपूजेच्या बाबतीत त्यांना पूर्णपणे घेता आली नाही. म्हणूनच वैदिकांनी मूर्तीपूजेचे वैदिक वाङ्मयातील संदर्भ काढून टाकण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी संपूर्णपणे मूर्तीशी संबधित उल्लेख त्यांना काढता आलेले नाहीत.संख्येने कमी जरी असले तरी मूर्तींशी संबधित उल्लेख वैदिक वाङ्मयात पाहायला मिळतात.

इतर आर्य लोकांच्या मूर्तीपूजेला त्यांना टाळता आले नाही. हे ब्राह्मण ग्रंथ, धर्मसूत्रे व स्मृतीवरून दिसून येते. खर्या अर्थाने आर्यांचा धर्म पूर्णपणे यज्ञ आधारित बनला नव्हता हे स्पष्ट दिसून येते.

आर्येतर वर्गाला ऋग्वेदात ७.२१.५, १०.९९.३३, ७.१०४.२४, १०.८७.२, १०.८७.१४ मध्ये शिश्नदेव, राक्षस, अनृतदेव, मुरदेव वगैरे नावांनी संबोधले आहे.

शिश्न एवं देवः येषां ते शिश्नदेवा अशी व्युत्पत्ती लावून काही विद्वान त्यांना लिंगपूजक ठरवतात.

ऋग्वेदात १०.२७.१९ या ठिकाणी शिश्न शब्दाचा प्रयोग केलेला आहे. येथेही सायणाने त्यांचा संबंध राक्षसांशी जोडला आहे.

मुरदेवांचा नाश करण्याची इंद्राला प्रार्थना केलेली आहे. मुरदेवाचा अर्थ मलदेव आणि राक्षस असा केला आहे. (ऋग्वेद ७.१०४.२४)
विल्सन ने हे पद फालतू देवांवर विश्वास ठेवणारे आणि अविनाशचंद्र दास यांनी दगड, झाडांचे बुंधे यांसारख्या अचेतन वस्तूंचे पूजन करणारे असा केला आहे.

अविनाशचंद्र दास यांच्या मतावरून असे वाटते कि अनार्य हे आजच्या आदिवासी संस्कृतीप्रमाणे निसर्ग पूजक असावेत.

पहिल्या भागात सांगितल्या प्रमाणे आर्यांचा भारतात प्रवेश इ.स.पु. २३०० च्याही आधीचा आहे. त्यामुळे साहजिकच सिंधुसंस्कृतीच्या उत्खननात सापडलेले घटक अनार्याशी तसेच आर्यांशी संबधित असण्याची शक्यता आहे.

सिंधू संस्कृतीत जी प्रतीकं आपल्याला मिळाली त्याचा आता विचार करू या.

सिंधू संस्कृतीच्या उत्खननात मिळालेल्या मुद्रा ज्यांवर मातृदेवी, वृक्षदेवी, पशुपती, नाग वैगैरेंचे दर्शन घडते.
मोठया संख्येने मिळालेले लिंगाकार दगड त्यांचा संबंध लिंग पूजेशी लावतात. त्याच बरोबर मधोमध भोक असलेले दगडही मिळाले आहेत हि योनीपिठे असावीत अशी कल्पना आहे.

विशिष्ट प्रकारची केशभूषा केलेल्या मातीच्या स्त्री प्रतिमाही आपणास मिळाल्या आहेत. यांना मातृदेवीच्या मूर्ती असे म्हणतात.

मातीचे कित्येक तुकडे असे आहेत कि ज्यावर मानव आकृत्या काढलेल्या आहेत. मॅक ची कल्पना अशी कि या गृहदेवता असाव्यात.

तीन तुकड्यांवर कायोत्सर्ग मुद्रेत उभे विवस्त्र असे वृक्षदेव दाखवले आहेत. या प्रत्येकाच्या जवळ अर्धा वाकलेला व डोक्यावर साप असलेला असा उपासक आहे.

एका दुसऱ्या तुकड्यावर आसन घालून बसलेल्या पुरुषाच्या डोक्यावर फणा पसरलेला साप दिसतो व आजूबाजूस गुडघे टेकून बसलेले उपासकही दिसतात.

एका चौकोनी तुकड्यावर तीन डोकी असलेला व शिंगाचा मुकुट घातलेला एक पुरुष योगासनात बसलेला दाखवलेला आहे.
या पुरुषाच्या आजूबाजूस म्हैस, गेंडा, हत्ती, वाघ दिसतो.
मार्शल यांच्या मते हा पुरुष म्हणजे पशुपती शिवाचे प्रारंभिक रूप होय.

श्री. के. गोळेगावकर यांनी सिंधू संस्कृतीवर नवा प्रकाश या तरुण भारत नागपूरच्या दैनिकात (९-७-१९९२) प्रसिद्ध झालेल्या आपल्या लेखात लिहिले आहे कि सिंधू संस्कृतीच्या मुद्रांमध्ये नागाच्या अनेक मुद्रा आहेत. ऋग्वेदातील ऋचेत अहिचा म्हणजे नागांचा उल्लेख आलेला आहे.
दक्षिणेतील द्रविड ओळखला जाणारा समाज हा मुख्यतः नागवंशीय असून त्यांच्यात अजूनही मातृसत्ताक कुटुंब पद्धती चालू आहे.

श्री. गोळेगावकरांनी द्रविड संस्कृतीचा संबंध नाग व स्रीसत्ताकतेशी जोडला आहे.
आर्यांच्या विरूद्ध दासांच्या स्त्रिया देखील लढल्याचे वर्णन ऋग्वेदात ५.३०.९ या ठिकाणी आलेलं आहे.

सिंधू संस्कृतीत कोणतेही धार्मिक स्थान सापडले नसले तरी उत्खननात सापडलेल्या काही मूर्तींवर काजळी जमल्यासारखी दिसते. यावरून देवीपुढे धूप वैगैरे जाळण्याची प्रथा असावी असे दिसते.

ग. ह. खरे या बाबतीत म्हणतात दक्षिणेत माता देवतेस फार महत्व आहे. आर्य संस्कृतीत यांना इतके महत्व नाही. प्रागार्य लोकांची हि देवता आहे.

त्रिशिर्षा / शिव :-

सिद्धेश्वर शास्त्री चित्राव 'रुद्र' या नोंदीत म्हणतात
"मुहंजोदडो मे - शिव कि अत्याधिक प्राचीन प्रतिकृती मुहंजोदडो एवं हडप्पा के उत्खनन में प्राप्त हुए सिंधू सभ्यता के खंडहरो मे दिखाई देती है । इस उत्खनन मे शिवस्वरूप से मिलते-जुलतें देवता के कई सिक्के प्राप्त है, जहां तीन मुखवाले एक देवता कि प्रतिमा चित्रांकित कि गई है । यह देवता योगासन मे बैठी है, एवं उसके शरीर का निचला भाग विवस्त्र है । मुहंजोदडो के इस देवता का स्वरूप महाभारत मे वर्णित किये गए शिव के 'त्रिशिर्ष' (चतुर्मुख), विवस्त्र (दिग्वसस), उर्ध्वलिंग (उर्ध्वरेतस), योगाध्यक्ष (योगेश्वर) स्वरूप से मिलता जुलता है।"

भारत इतिहास संशोधन मंडळाने प्रकाशित केलेल्या मूर्तीविज्ञान या पुस्तकात डॉ. ग. ह. खरे या बाबतीत म्हणतात.
"हा एका चौरंगावर आसन मांडी घालून पायाचे तळवे एकमेकांवर ठेवून जमिनीस चिकटतील अश्या तर्हेने बसला असून हात योग्याप्रमाणे गुढघ्यावर ठेवण्याच्या। उद्देशाने जवळ आणले आहेत. तोंड व डोळे प्रत्येकी तीन आहेत. डोक्यावर मध्यभागी मुकुट असून दोन बाजूस दोन शिंगे आहेत. प्रत्येक हातावर तीन मोठी व मध्ये प्रत्येकी चार अशी आठ मिळून ११ कंकने आहेत. देवाच्या गळ्यात एकाखाली एक लोंबणारे असे त्रिकोणी हार आहेत. कमरेस बंध असून लिंग व वृषण हि बहुदा दिसत आहेत. म्हणजे मूर्ती नग्न आहे किंवा कदाचित ती मेखलेची टोके असू शकतील. उजवी कडे वर वामावर्ती हत्ती, त्याखाली सव्यावर्ती व झडप घालणारा वाघ आणि डाव्या बाजूस वर वामावर्ती गेंडा व त्याखाली चवताळलेला म्हैसा आहे. चौरंगाखाली एकमेकाविरुद्ध तोंडे फिरवलेले पण शिंगे जवळ आणलेले दोन हरीण आहेत.
शंकरास पशुपति, महायोगी हि नावे असून त्याच्या दक्षिणामुर्ती अथवा योगदक्षिणामूर्ती या रूपात त्याच्या जवळ हरिणही दाखवलेले आढळतात. शंकरास एक, तीन, चार, पाच तोंडे असू शकतात. त्यास तीन डोळे असल्याचे अनेक ठिकाणी वर्णिलेले आहे. तेव्हा हि मूर्ती शंकराची असली पाहिजे यात शंका नाही"


सिंधू संस्कृतीत मिळणारी 'त्रिशर्ष' हि मूर्ती व वेदातील त्वष्टापुत्र 'त्रिशिर्षा' हे एकच आहेत. त्यामुळे सिंधू संस्कृती हि वेदोत्तर संस्कृती आहे असे काही इतिहासकारांनी म्हटलेले आहे.

शिव आणि वेदातील त्वष्टापुत्र त्रिशिर्षा  हे एकच होते ?

सप्तसिंधुच्या प्रदेशात वृत्राचे प्रभुत्व होते. त्याला अहि असेही म्हणत. तो दास व दस्यु लोकांचा पुढारी किंवा राजा होता.

या अहिवृत्र ला मारण्यासाठी त्वष्टा याने वज्र तयार करून इंद्राला दिल्याचा उल्लेख ऋग्वेदात (१.३२.२) आहे. याच्या मोबदल्यात इंद्राने त्वष्टयाच्या मुलाला 'त्रिशिर्षा' ला आपले पौरोहित्य दिले.

पुढे त्रिशिर्ष आपल्या विरुद्ध बंड करेल या भीतीने इंद्राने त्याची डोकी तोडल्याच वर्णन ऋग्वेदात (८.९६.९)  आलेलं आहे.

ऋग्वेदात जेवढ्या पण हत्या झाल्या. ते सर्व पराक्रम इंद्राने केले आहे असे वेद वाङ्मय इंद्राचा मोठेपणा सांगत असतात. त्यात थोडंफार सत्य आणि थोडा मोठेपणाचा प्रभाव असतो.

यातील सत्य इतकेच कि त्रिशर्ष हा बंड करेल असं इंद्राला वाटण शक्य आहे. पण त्याने त्रिशर्षाची हत्या केली असं म्हणणं हा इंद्राला हिरो बनवण्याचा वेदांचा प्रयत्न होता. पण दुसरीकडे याच मुद्द्यांचा वापर करून पुराणांनी (पूराण हे सुतांनी लिहिली सूत हे वैश्य होते) इंद्राला जीरो ठरवले. त्याच्या उच्चस्थानापासून त्याला खाली पाडले.

शतपथ ब्राह्मणाने जी माहिती दिली आहे त्यानुसार त्रिशिर्षा आपल्या विरुद्ध बंड करील अस इंद्राला वाटले व तो त्रिशिर्षा च्या हत्येचा विचार करू लागला. पण त्रिशर्षा ची हत्या दुसर्याने केली. आणि इंद्र त्रिशर्षा ब्राह्मणाच्या हत्येतून घडणार्या पापातून मुक्त झाला. त्रिशिर्षाची हत्या कुणीतरी दुसर्याने केली म्हणून इंद्रावर हे पाप आलं नाही

मग त्रिशर्षाची हत्या कुणी केली ?

त्रिशिर्ष हा जसा आर्य त्वष्टयाचा पुत्र होता तसाच तो दैत्यांचा भाचा देखील होता (तै. स. कांड २.५.१) त्रिशिर्षाला विश्वरूप सुद्धा म्हणत असत.

दासांनी व आर्यानी करार केल्याची उदाहरण वैदिक वाङ्मयात आलेली आहेत.
दोन राज्यामध्ये करार होत असे तेव्हा तो करार दुसर्या राज्यातील स्त्रीशी विवाह करून केला जात असे याचा परिणाम राजांचे अनेक लग्न होत असत. असे विवाह मध्ययुगातील राजेशाहितहि आपल्याला पाहायला मिळतात.
त्वष्टयाने दैत्य कन्येशी लग्न केले होते हा त्या कराराचा भाग होता.
या आर्य-अनार्य विवाहातून त्रिशिर्षाचा जन्म झाला होता. ह्याच त्रिशर्षाला इंद्राच पुरोहित पद मिळाले.

तै. संहितेत पुढे म्हटले आहे कि "या त्रिशिर्षा ला सोम पिणारे, सुरा पिणारे, आणि अन्नाचे भक्षण करणारे तीन मस्तके होती. तो (यज्ञात) समंत्रक यज्ञभाग (आहुती) देवांना प्रत्यक्षरीत्या आणि असुरांना अप्रत्यक्ष रित्या देत असे. वस्तुत: (ऋत्विज) समंत्रक यज्ञभाग सर्वाना प्रत्यक्षरीत्या देत असतात. ज्यांच्यासाठी अप्रत्यक्षरित्या मंत्र म्हणतात. त्याच्यासाठी त्याने भाग दिला. त्यामुळे इंद्र भ्याला. असे घडत राहिले तर राष्ट्र नष्ट होईल असे त्याला वाटले."

यावर भाष्य करताना डॉ. आ. ह. साळुंखे आपल्या बळिवंश या पुस्तकात म्हणतात
"विश्वरुपाला तीन तोंडे होती असे सांगण्याचा हेतू स्पष्ट आहे. देवांकडच्या ब्राह्मण पुरोहिताना सोम पिण्याचा अधिकार होता. विश्वरूप अश्या पुरोहितांमध्ये अंतर्भूत झाल्यामुळे त्याला सोम पिण्याचा अधिकार मिळाला होता. वैश्याना सोमाऐवजी सुरा द्यावी. क्षत्रियांना सोमाऐवजी इतर पेये द्यावीत. समुद्र मंथनानंतर असुरांना सुरा देण्यात आली. इ. तपशील प्रसिद्ध आहेच. विश्वरूपाला सुरा पिणारे तोंड होते असे सांगण्यामागे त्याचे असुरत्व दर्शवन्याचा हेतू आहे, हे उघड आहे. त्याला अन्न खाणारे मुख असल्याचे सांगण्यामागे त्याचे यज्ञ बाह्य लौकिक स्वरूप दाखवण्याचा उद्देश आहे. वैदिक संस्कृतीने तीन मुखे असलेल्या ब्रह्मदेवाची कल्पना विश्वरूपाच्या या स्वरूपावरूनच उचलली असण्याची शक्यता आहे"

डॉ. आ. ह. साळुंखे त्वष्टयाला अनार्य समजतात. खर तर त्वष्टा हा आर्याचा वास्तू निर्माता (रचनाकार) होता तर अनार्याचा मय हा वास्तू रचनाकार होता.

तैतरिय संहितेने (२.५.१) ज्या प्रकारे विश्वरूप चे वर्णन केले आहे त्यानेही हि बाब सहज लक्षात येते कि त्वष्टा हा आर्य होता.

विश्वरूपाला सोम पिण्याचा अधिकार तो देवांचा पुरोहित झाला त्यामुळे मिळाला हे डॉ. आ. ह. साळुंखे यांचं म्हणन खरं आहे. परंतु त्याला सुरा पिणारे तोंड हे त्याचे असुरांशी नाते दाखवणारे आहे हे त्यांचं म्हणन स्वीकारता येण्यासारखे नाही ते सुरा पिणारे तोंड तो प्रामुख्याने वैशांशी संबंधित असल्याचे निदर्शक आहे.(आ.ह. साळुंखे देखील वैश्याना सोमाऐवजी सुरा दिली जात होती हे मान्य करतात)  आपण पहिल्या भागात पाहिलेच आहे कि वैश्य (आर्य) हे भारतात सर्वात आधी आलेले आर्य असून त्यांची संख्या आर्य लोकात सर्वात जास्त होती. या वैश्य लोकांचा शुद्रांएवढा नसला तरी छळ झाला होता.

विश्वरूपाला तिसरे अन्न खानारे मुख त्याचे यज्ञ बाह्य लौकिक स्वरूप दाखवणारे आहे हे डॉ. साळुंखे यांचं म्हणन अगदी बरोबर असून हे तिसरे मुख त्याचा दैत्यांशी संबंध दर्शवतो.

म्हणजे विश्वरूप वडिलांकडून आर्य व आईकडून अनार्य आहे. आर्य लोकात वर्ण वडिलांकडून ठरत असल्याने तो वैश्य (आर्य) ठरला. म्हणून त्याला इंद्राचे पुरोहितपद मिळाले.

डॉ. साळुंखे यांनी त्रिशर्ष च्या स्वरूपावरूनच ब्रह्मदेवाची कल्पना वैदिकांनी उचलली असण्याची शक्यता वर्तवली आहे. खर तर त्रिशिर्ष च्या स्वरूपावरून शिवाची कल्पना वैदिकांनी उचलली असण्याची शक्यता डॉ. साळुंखे यांनी वर्तवली असती तर ते अगदी योग्य ठरले असते. (वृत्रची हत्या त्वष्टयाच्या साहाय्याने झाली. वृत्र हा पुराणातील हिरण्याक्ष आहे. हिरण्यक्षाला मारण्यासाठी विष्णूनी वराह अवतार घेतला असं म्हटलं जातं पण प्रामुख्याने वराह हा अवतार ब्रह्माशी संबंधित आहे.) ब्रह्मा ला स्रष्टा (निर्माणकर्ता) म्हटले जाते त्याचे साम्य त्वष्टयाशी जास्त मेळ खाते. त्वष्टयाला विश्वकर्मा असेही म्हणतात. ब्रह्मदेवाचे एक नाव विश्वकर्मा आहे. शिवाला त्रिशर्ष प्रमाणे यजुर्वेदात वीश्वरूप म्हटले आहे. ब्रह्माला शिवाचा पूर्वज मानले जाते. वेदात त्वष्टा हा देवांचा पिता मानला गेला असून प्राजातपोदक म्हणून त्याचे तेथे स्थान आहे. पुराणातील ब्रह्माचे या त्वष्टयाशी साम्य असून शिवाचे साम्य त्रिशिर्षशी आहे.

रुद्र म्हणजे शिव. शिवाला मरुतांचा पिता म्हटलेलं आहे. या मरूतांना वैदिक वाङ्मयात विश: म्हणजे वैश्य म्हटलं गेलय. हे मरूत इंद्राचे मदतनीस होते. इंद्राला मरुत्सखा म्हटले गेले आहे.

चार वर्णां पैकी तिसरा वर्ण म्हणून वैश्य ज्ञात आहेच. वैदिकांनी देवांमध्येही चातुर्वर्ण्य असल्याचे सांगितले आहे. बृहस्पती ब्राह्मण, इंद्र हा क्षत्रिय, व मरूत हे वैश्य मानले गेले आहेत
(बळिवंश p.91)

मरुताना काही ठिकाणी शाक हि म्हटलं गेलेलं आहे. कोसंबी या शाकचा संबंध शकांशी जोडतात. शंकांचं दैवत महादेव. शकांचा भारतात प्रवेश इ.स. च्या जवळपासचा मानला जातो. कर्मवीर शिंदे शकांचं आगमन टप्प्या टप्प्याने भारतात झाल्याचे व काही शक टोळ्या ऋग्वेदी आर्यांच्या आगोदर भारतात आल्याचे सांगतात.

रुद्र हा वैश्य ठरतो. कारण तो मरुतांचा पिता आहे. रुद्राचे जसे यज्ञ होतं. तसेच मरुतांसाठी यज्ञ होत. रुद्रावर (शिवावर) जशी यज्ञ विध्वंसाची कथा आहे. तशीच कथा मरुतांवर देखील आहे. या सर्व कथांचा अर्थ शिव व मरुतांचे वंश नंतर यज्ञ कर्मकांडाकडून ब्रह्मधर्मीय ज्ञानकांडाकडे गेले. त्यामुळे त्यांना अश्या कथा निर्माण करणं भाग पडलं किंवा गरजेचं वाटलं असावं.

शिवाला काही अभ्यासक या यज्ञ विध्वंसाच्या कथेमुळे अनार्य समजतात. पण हे मत चुकीचं आहे. गौतम बुद्ध हिंसक अश्या यज्ञाचा विरोधक होता. वैदिकांनी त्याला विष्णूचा अवतार जरी मानला असला तरी बुद्धसाठी असे हिंसक यज्ञ केल्याचे कुठेही आढळत नाही. या उलट शिवाच्या व मरुताच्या यज्ञ विध्वंसाच्या कथा जरी असल्या तरी त्यांच्यासाठी हिंसक यज्ञ होत असत. अश्वलायन गृह्यसूत्रात शिवासाठी यज्ञ कसा करावा याचे वर्णन आहे.

रिलीजन्स ऑफ इंडिया (पृ. १६३, टीप २) या ग्रंथात बार्थ हे शिव हि अनार्य देवता होय असे म्हणने अयोग्य होय असे मत व्यक्त करतात.

वर सांगितल्या प्रमाणे नंतर शिवाचे व मरुतांचे वंश ज्ञानकांडाकडे गेल्यामुले त्यांनी शिवाच्या नावावर व मरुतांच्या नावावर यज्ञ विध्वंसाच्या कथा रचल्या.

शिवाची मूर्तीपूजा होत होती तेव्हाही तो अहिंसक नव्हता. महाभारतात शिवाला नरबळी देण्यात येत असल्याचे वर्णन आहे.
जैन व बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर अनेक वैदिक दैवते अहिंसक बनली. त्यातच शिव सुद्धा अहिंसक दैवत बनले.

महाभारतात वृत्रगीता नावाचे प्रकरण आहे. त्यात वृत्राची हत्या कशी झाली याची माहिती दिलेली आहे. महादेव ज्वर होऊन वृत्राच्या अंगात शिरला व विष्णू इंद्राच्या वज्रात शिरला आणि त्यामुळे वृत्राचा वध करता आला असे त्यात म्हटले आहे.

रुद्राने दासांची तीन नगरे फोडून असुरांना पळवून लावले असे तैतरिय संहिता, शथपथ ब्राह्मण, ऐतरेय ब्राह्मण यात सांगितले आहे. यात पुराणातील त्रिपुर दाहाच्या कथेचे मूळ आहे.

अथर्ववेदात रुद्राला अर्धकघातीन असे विशेषण वापरले आहे. महाभारताने शिवाला अंधकघातीन असे रूप दिले आहे. यात अंधकासुराचे बीज असावे असे वाटते.

वैदिक साहित्यात ज्याच्या मृत्यूची काही माहिती मिळत नाही त्याचा अंतर्भाव चिरंजीव मध्ये केलेला आहे.

अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, बिभीषण, कृप, परशुराम, मार्कंडेय ह्यांचा चिरंजीवी मध्ये समावेश होतो. बळीची महती मोठी म्हणून वैदिकांना देखील त्याची दखल घ्यावी लागत होती हे यावरून दिसते.

ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा अंतर्भाव चिरंजीव मध्ये नाही. त्यांचा चिरंजीव मध्ये अंतर्भाव नसण्याचे तीन मुद्दे असू शकतात.

पहिला मुद्दा हे तिघेही काल्पनिक पात्र असावेत.
दुसरा मुद्दा ते सर्वात मोठेदेव मानले गेले असल्यामुळे त्यांना अमर ठेवलं गेलं असावं ( तरीही ते जर काल्पनिक नसतील तर त्यांचा मृत्यू झाला असणार)
तिसरा मुद्दा त्यांच्या मृत्यूची नोंद एका वेगळ्या स्वरूपात मांडली गेली असणार.

त्रिशिर्षा जर शिव असेल तर शिवाची हत्या कोनाकडूनतरी झाली होती हे स्पष्ट आहे.

महिषासुरमर्दिनी दुर्गा :-

शिवाच्या पत्नीबद्दल ग.ह. खरे म्हणतात
"अंबिका हे शिवाच्या पत्नीचे नाव वाजसनेयी संहितेत आहे, परंतु तेथे ती त्याची बहीण असल्याचे म्हटले आहे.
उमा आणि पार्वती हि नावे प्रथम केनोपनिषद व तैतरिय आरण्यक यात येतात. पण तेथे ती शिवाच्या पत्नीला उद्देशून आहेत कि नाहीत याविषयी शंका आहे.
(मूर्तीविज्ञान, p 82)


महिषासुराचा वध दुर्गेने केला आहे. त्याबद्दल कोसंबी म्हणतात
"मोहंजदडोच्या मुद्रांवर आपल्याला एक नग्न त्रिमुखी देव आढळतो पण त्याने डोक्यावर महिषशृंगे घेतलेली आहेत. पशुपालक महिषदेव म्हसोबा व पार्वतीने जिचा वध करून महिषासुर मर्दिनी हि पदवी मिळवली तो महिषासुर एक असणे हा योगायोग नाही. योगेश्वरीच्या भूमिकेत पार्वतीचे काही वेळा शिव-भैरवाशी सादृश्य असलेल्या व म्हसोबाशी जुळतामिळता असलेल्या देवाशी लग्न लावले जाते. यातून कालीच्या स्वरूपातील पार्वती जमिनीवर पडलेल्या शिवाच्या शरीराला बहुदा शवाला पायांनी तुडवीत असल्याचे दाखवणार्या कालीघाटच्या चित्रावर व मूर्तीवर थोडाफार प्रकाश पडेल. तिच्या जीवनदायी पदमर्दनातून तो पुनर्जीवित होतो हि या संघर्षाची प्रखरता सौम्य करण्यासाठी टाकली गेलेली भर आहे हे उघड आहे."

शरद पाटील याबद्दल शिल्पांकनाचा दाखला देत म्हणतात.
"मामलपुरमचे उत्थित शिल्पांकन (कातळात खोदलेले) मातृदेवता दुर्गा महिषासुराचा वध करीत असल्याचे दाखवते पण हा तथाकथित असुर 'जानवं' घातलेला आहे व डोक्यावर छत्र धरलेला दाखवलेला आहे."

ज्या दुर्गेने महिषासुराचा वध केला आहे. त्या महिषासुराला शरद पाटील तथाकथित असुर म्हणतात याचा अर्थ ते या महिषासुराला असुर मानत नाहीत. त्या महिषासुराने 'जानवं' घातलेलं असणं हे दाखवने त्याला आर्य संस्कृतीशी जोडते.

कोसंबीनी महिषासुराचा संबंध शिव-म्हसोबाशी जोडला आहे.
शरद पाटील यांनी देखील शिव-रुद्र-महिषासुर हे एक होते असे म्हटले आहे.

महिषासुराचा वध दुर्गेने केला या गोष्टीसाठी मूलनिवासीवादी दुर्गेला अर्वाच्य भाषेत शिव्याचा वापर करून बोलतात.
खरतर स्त्री कोणतीही असो आर्य असो किंवा अनार्य असो त्यांच्याविषयी इतक्या खालच्या पातळीवर बोलणं योग्य नाही.
मुळात ते दुर्गेला आर्य समजतात तर शिवाला अनार्य समजतात. परंतु परिस्तिथी नेमकी याच्या उलट आहे शिव आर्य तर दुर्गा हि अनार्य आहे. मूलनिवासीवाद्यांच्याच भाषेत सांगायचं तर दुर्गा हि मुलनिवासी ठरते तर शिव परका.

लोककथेत याला अजून आधार मिळतो.
अलेक्झांडर रॉबर्टसन आपल्या महार फोक या ग्रंथात म्हणतात
"बाँबे गॅझेटच्या धारवार वोल्युममध्ये पोतराज ह्या शब्दाचा पुढील अर्थ सांगितला आहे. 'पोतराजा किंवा म्हशींचा राजा' हेल्याच्या वर्गात मोडतात. त्यांच्या नावाचा उगमाचा इतिहास असा आहे कि त्यांचा एक पूर्वज ब्राह्मणाच्या रूपात दयामावचा नवरा बनला. दयामाव हि लक्ष्मीचा अवतार होय. ते दांपत्य अनेक वर्ष एकत्र राहिले व त्यांना मुलेबाळे झालीत. दयामावच्या विनंतीनुसार हेल्याने आपल्या आईला तेथे राहायला आणले. एक दिवस दयामावने तयार केलेले गोड पदार्थ खात असताना आई आपल्या मुलाला म्हणाली 'भाजलेल्या मासांप्रमाणें हे जिभेला लागते' आपल्याला फसवण्यात आलेले आले. आपली अवनती झाली हे जाणून दयामावने घर जाळले आणि मुले ठार केली. म्हसोबा झालेल्या आपल्या नवर्याचा पाठलाग केला व त्याचाही जीव घेतला."

अनार्य लोक कथा मौखिक पद्धतीने जपून ठेवत. त्यातले काही संदर्भ काळाच्या ओघात हरवलेले असतात. या कथेत जरी बाकी संदर्भ हरवलेले असले तरी म्हसोबाला ब्राह्मण म्हणनं त्याच आर्य रूप दर्शवते त्याच बरोबर तो तिचा पती असून देवीने त्याचा वध केला हा संदर्भ येथे महत्वाचा आहे.

दसर्याच्या दिवशी म्हसोबाला बळी देण्याची प्रथा पडलेली असून दक्षिणेत अश्या प्रथा पहायला मिळतात.

तंत्र साहित्य प्रामुख्याने शक्ती देवीचं मानलं जातं व ते वैदिकांच्या विरोधी मानलं जात.
पण काळाच्या ओघात शैव तंत्रे व वैष्णव तंत्रे वैदिकांनी निर्माण केली. त्यामुळे तंत्रांना पंचम वेद मानण्यात आले.

प्रामुख्याने अनार्याची तंत्र पूजा व भूतपूजा हि मौखिक परंपरेने जपली गेली. पण यामुळे आर्यानी ह्या पद्धतीत घुसपेठ केली या बद्दल ग्राऊल यांचे मत प्रा. भट्ट यांनी नोंदवलेले असून बळिवंश मध्ये डॉ. आ.ह. साळुंखे यांनी ते उद्धृक्त केले आहे. तामिळनाडू मधील तीन चतुर्थांश लोक भूतआराधना करणारे आहेत.

शाक्त तंत्रातील माहिती देत असताना डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणतात
"मानव बळी देण्याची प्रथा हिंदुस्थानात सर्वत्र होती. भारतात अनेक ठिकाणी मानव बळी दिले जात आहेत हि वस्तुस्थिती आहे. ज्यांचे पूर्वज दुर्गा आणि काली यांच्या पूजेच्या वेळी मानव बळी देत. अशा वामाचारी पंथांच्या कुटुंबातून  आजही प्रत्यक्ष मानवबळी ऐवजी प्रतिमा बळी देत आहे..... नरबळी आणि शुभबळी हे दोन्ही गुप्तपणे केले जाणारे विधी आहेत. हे विधी रात्री मध्यरात्री करतात..... असे सांगितले गेले आहे कि राजाने खिरीची प्रतिमा तयार करून शुभबळी द्यावा. त्याने स्वतःच त्याचा वध करावा. बळीकडे क्रोधायुक्त नजरेने बघावे. एकाच घावात त्याने त्याचे दोन तुकडे करावे. प्रथम प्राणप्रतिष्ठा करावी. ज्याचा नाश व वध करायचा आहे त्याचे नाव उच्चारून 'हे महेश मित्र' असे म्हणत तो शुभवध करतो."
(रिडल इन हिंदुइजम)

यात ज्याचा वध करायचा आहे. नाश करायचा आहे त्याला महेश मित्र म्हणून उच्चारने हि क्रिया वर जी मांडणी आहे त्याला समर्थन करणारीच आहे. शिवालाच महेश असे म्हणतात.

निऋती चे एक नाव दुर्गा आहे. हि निऋती देवी अनार्य देवता आहे. सिंधू संस्कृती मध्ये डोक्यावर उभी असलेली व योनीतुन वनस्पती उगवत असलेली जी नग्न स्त्री शिल्पाकित केलेली आहे व दुसर्या मुद्रेत एक देवता अश्वथ वृक्षात उभी असलेली दाखवलेली आहे तिला शरद पाटील निऋती देवी म्हणतात.

नरकासुर हा निऋती चा पुत्र त्यालाच नैऋत असे म्हटले जाते. निऋती ला नरक देवी असेही म्हटले जाते. निऋतीची दिशा मृत्यूची दिशा बनली तिचे पूर मोहंजदडो हे प्रेतांची टेकडी म्हणून ओळखले जाते. भूमाता निऋती ला सर्प-राज्ञी असे म्हणतात. मातृवंशक सिंधू समाज पितृवंशक आर्यांकडून पराभूत झाल्यानंतर पाताळात ढकलला गेलेल्या असुर राजर्षी बळी प्रमाणे तो नरकात चिरस्थायी झाला. या रसातळाला नागलोक म्हणतात. भूमातेच्या उपासकांचा लोक; कारण नाग हे कद्रुची प्रजा असल्याचे सांगीतले जाते. नाग लोकाला बलि-सद्म असेही म्हणतात. तोच असुर राजर्षी बळीचा निवास.
(दास शुद्रांची गुलामगिरी)

रामायणात असे म्हटले आहेकी बळीला पाताळात ढकल्यावर महेंद्र ला राजा केले गेले. हा महेंद्र नक्की कोण हे कळण्यास मार्ग नाही. [जैन साहित्यात जे देवसमुदाय दिलेले आहेत त्यात कल्पोभव मध्ये ईशान (शिवाचे नाव) नंतर सनत्कुमार (याला काही अभ्यासक कार्तिकेय मानतात.) त्यानंतर महेंद्राचे नाव येते]

नैऋत्य दिशाही केरळच्या प्राचीन व मध्ययुगीन लोकांचीही पवित्र दिशा होती. प्रत्येक खेड्याचे स्वतःचे सभागृह व सभास्थान असे व ते ग्राममंदिराच्या नैऋत्य दिशेला असे.

अशी नैऋत्य दिशा हि वैदिकांनी अशुभ मानली होती तर वैदिकांच्या दृष्टीने या विरुद्धची दिशा ईशान्य हि पवित्र होती.
शिवाचे एक नाव ईशान आहे. निऋतीला मृत्यू म्हटले जाते तर शिवाला मृत्युंजय. म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा म्हटले जाते. शिव म्हणजे पवित्र व दुर्गा हि वैदिकासाठी शिवी (अपवित्र) आहे.

याउलट म्हणजे दक्षिणेकडे द्रविडांच तर उत्तरेकडे आर्यांचं प्राबल्य मानलं जातं. दक्षिणेकडे शिवाच्या प्रसादाला हेय (तुच्छ) मानलं जातं.

शिव आर्य आहे व दुर्गा अनार्य आहे म्हणूनच हा भेद केलेला आहे.

लिंगपूजा :-

सिंधू संस्कृतीच्या उत्खननात शिवाची प्रतिमा व लिंग हि दोनीही प्रतीकं सापडलेली आहेत.
एकाच दैवताची एकाच वेळेला दोन भिन्न प्रतिकात पूजा संभवनीय वाटत नाही.

या बद्दल ग. ह. खरे आपल्या मूर्तीविज्ञान पुस्तकात म्हणतात :-
"शंकराची आज सयोनी लिंग व मूर्ती या दोन स्वरूपात लोक पूजा करतात. मोहंजोदडो, हरप्पा, बलुचिस्थान इत्यादि ठिकाणच्या उत्खनन संशोधनात हि दोन्ही प्रतीकं सापडली आहेत. पैकी योगेश्वर मूर्ती महादेवाची अर्थात शंकराची प्रतीक असावी असे अनुमान आहे. व मोहंजोदडो येथील शिलालेखाचे विद्वसंमत वाचन झाल्यावर खरे ठरेल इतके ते साधार आहे. पण लिंगाची गोष्ट तशी नाही. लिंगे व योनी यांची त्यावेळीहि पूजा होई. अर्थात ती कोणत्या तरी देवतेची प्रतीक आहेत हे खास. पण योगीश्वर हे ज्या देवतेचे प्रतीक त्याच देवतेचे योनिसह लिंग हे प्रतीक होते कि नाही हे सांगता येत नाही. कारण उघड आहे. शिव हि केवळ द्राविडी देवता असून तिचे प्रतीक लिंगपूजा युरेशिया म्हणजे आशिया व युरोप या दोन्ही खंडातील अनेक देशात फार प्राचीन काळापासून प्रचलित होती. हिंदुस्थान वैगेरे पौर्वात्य देशात ती आजही जारी आहे. युरोपातील कित्येक देशात ती १५/१६ व्या शतकापर्यंत प्रचलित होती. या मुळे या पूजेचे योनिलिंग रुपाचे अवशेष इंग्लंड, फ्रांस, इटली, नॉर्वे, वैगेरे अनेक देशातून सापडली आहेत. सजीव सुष्टी जर योनी व लिंग यांच्या संयोगाने उत्पन्न होते तर निर्जीव सृष्टीही तशाच तर्हेने उत्पन्न होत असली पाहिजे..... अशा समजुतीने मूलतः त्यांची पूजा प्रचारात आली.....असे लोक प्रत्येक देशात सर्वकाळी असल्यामुळे फार मोठ्या भूभागावर याचे पुष्कळ काळ महत्व टिकून राहिले. हिंदुस्थानातही या प्रतिकाची प्रथम स्वतंत्र रीतीने व स्वतंत्र देवता म्हणून पूजा होत असावी. पण पुढे द्राविडी देवता शिव हिला सर्वव्यापी महत्व येऊन तिचे जगाचे आदिकारण, अर्धनारीश्वर हे त्या कारणाचेच रूप अशी समजूत सर्वसामान्य लोकात प्रचलित झाल्यावर सयोनीलिंग हे हि त्या शंकराचे प्रतीक आहे असे समजू लागले अश्या तर्हेने लिंगपूजा अनार्य व शिवदेवता द्राविडी असत: दोघांचे एकीकरण झाले"

डॉ. नी. पु. जोशी यांनी आपल्या भारतीय मूर्तिशास्त्र या पुस्तकात पुढील मत व्यक्त केले आहे.
" श्री परिपूर्णानंद वर्मा यांनी अनेक पाश्चात्य लेखकांचा आधार घेत आपल्या ग्रंथात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कि जगाच्या कानाकोपर्यात वासना आणि प्रजनन या दोन कारणांमुळे लिंगपूजेचा प्रसार झाला होता. एका दुसर्या लेखकाचे कटनेरचे म्हणने असे कि लिंगपूजा सर्वप्रथम इजिप्त देशात सुरु झाली व ती तेथे ख्रिस्ताच्या चौथ्या शतकापर्यंत चालू होती. श्री. वर्मा यांनी या पद्धतीविषयी जास्त विस्ताराने लिहिताना असे विधान केले आहे कि इजिप्तमध्ये आयसिस याने सर्वप्रथम लिंगपूजनाचा प्रारंभ केला."

कोसंबी हे हिंदी संस्कृती आणि अहिंसा या पुस्तकात म्हणतात.
"ह्यूएनत्संग याच्या प्रवासवर्णनात कुठेही लिंगपूजा आढळत नाही. व महादेवाच्या मूर्तीची वर्णने वाटेल तेव्हढी आढळतात."

प्रो. दांडेकर यांनी विष्णू या निबंधात काही मुद्दे उपस्थित केलेत
" या बाबतीत सर्वात महत्वाचा शब्द म्हणजे शिपीविष्टि हा शब्द वेदांमध्ये विष्णुसाठीच वापरला आहे. शिपीविष्ट या शब्दात व्यक्त होणार्या अर्थच्छटा दाखवणारे संदर्भ वैदिक कवींनी मोठ्या काळजीपूर्वक गुंफले आहेत. या शब्दाचे स्पष्टीकरण करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. पण तत्वज्ञानाच्या दृष्टीने त्यातील फारच थोडी स्पष्टीकरणयुक्त ठरतात. आणि कुठल्याच खुलाशाने विष्णूचे खरे स्वरूप सांगता येत नाही. व्युत्पत्ती शास्त्र किंवा शब्द शास्त्र यांचा विचार करता शेप (लिंग) आणि शिपी यांना वेगळे करता येत नाही. निरुक्तातही हाच विचार मांडला आहे.
निरुक्त विष्णूबाबत काय म्हणते ते पहा- शिपीविष्ट या शब्दावरून विष्णूचे प्राचीन लिंगरुप ध्यानी येते वेद ऋचामध्ये आणखीही विशिष्ट संदर्भ आहेत. या संदर्भावरून प्रजनन क्षमता, स्वयंजीवन यांचा बोध होतो.
वेदातील श्राद्धविधीत एक चमत्कारिक प्रक्रिया आहे..... पितरांना अर्पण करावयाच्या वस्तूमध्ये नख असलेला अंगठा बुडवणे हि कृती विष्णूला आवाहन करताना करतात. अंगुष्ठ हे प्रतीक लिंगाचेच आहे. वेदकर्माचा जो लैंगिक भाग आहे त्यांच्याशी विष्णूचा प्रत्यक्ष संबंध आहे. या नंतरच्या वाङ्मयात विष्णूचे स्वरूप अंगुष्ठ निर्देशित असल्याचे बघावयास मिळते. आणखी एका उतार्यात याचा पुरावा सापडतो. विष्णूचा पृथ्वीमातेवर प्रवेश हि क्रिया म्हणजे निर्माण क्षमतेचे प्रतीक आहे. त्याचेच वर्णन प्रतीकस्वरूपात दिलेले आहे. तनवर्धना : इ. शब्द त्याच्या लिंगस्वरूपाचे निदर्शक आहे. या नंतरच्या वाङ्मयात विष्णू हा हिरण्यगर्भ आणि नारायण यांच्याशी जुळता आहे. विष्णूचा संबंध सिनावाली चा अधिक जवळचा आहे. हि देवता विस्व्रुत पार्श्वभाग असलेली. स्त्री लिंगकार्याचे रक्षण करणारी हि देवता. यांवरून विष्णूच्या व्यक्तिमत्वाचा अधिक परिचय होतो. सांख्य गृहसूत्रानुसार गर्भविधी हा मंत्रासहित होतो. यांवरून असे ध्वनित होते कि, श्री विष्णू हा गर्भांचा रक्षणकर्ता आहे. अथर्ववेदात तर विष्णू हा उघडपणे लिंगकार्याशी संबंधित असल्याचे सूचित केले आहे. पौष हा शब्द पुरुषीजोम या अर्थानेच वापरला आहे. विष्णूच्या संदर्भातच तो ऋग्वेदात वापरला आहे. वृषकपीऋचेत तो आहे. इंद्र हा दमला, थकला, भागला. त्यावेळी एक धीट आणि जोमदार माकड (वानर) पुढे आले आणि त्यांने त्याला औषध दिले. त्यामुळे इंद्राला पुन्हा आपली शक्ती मिळाली. या नंतरच्या वाङ्मयात वृषकपीचे उल्लेख आहेत. त्यांचे साम्य विष्णूशी आहे. विष्णूसहस्रनाम स्तोत्रात विष्णूचे एक नाव म्हणून वृषकपी दिले आहे."
(रिडल इन हिंदूइजम)

ग.ह.खरे, डॉ.नी.पु.जोशी, कोसंबी यांच्यामते लिंग पूजेचा संबंध शिवाशी नाही.
रा.ना.दांडेकर यांनी लिंग पूजेचा संबध विष्णूशी जोडला आहे.

वेदांनी लिंगपूजेचा संबंध विष्णूशी जोडला आहे. विष्णू स्वत: यज्ञ स्वरूप असल्याने पूर्णतः लिंग पूजेचा संबंध विष्णूशी जोडला गेला नाही तरी शाळीग्राम रूपात त्याची काही ठिकाणी पूजा होते. तर दुसरी कडे पुराणांच्या प्रचाराने शिवाचा संबंध लिंग पूजेशी जोडला गेला. पुराणांची रचना सुतांनी (वैश्य आर्य) केली आहे. त्यांची संख्या आर्य लोकात जास्त होती हे हि एक लिंगपूजेच शैविकरण यशस्वी होण्याचे एक कारण आहे.

रां. ची. ढेरे यांनी प्रतिकांच्या शैविकरन व वैष्णवीकरन या उन्नयन प्रक्रियेबद्दल त्यांच्या लज्जागौरी, श्री विठ्ठल एक महासमन्वय या पुस्तकातून बरेच लिहिले आहे. हि दोन्ही पुस्तकं वाचकांनी जरूर वाचावीत.

माहूरझरी येथे मिळालेली उत्तानपाद आणि शिरोहिन नग्न देवी हि द्रविडपूर्व भूमिरूप मातृदेवता असल्याचा कयास डॉ. हंटर यांनी लावला आहे. अश्या शिरोहिन प्रकारच्या अनेक मूर्तींची नोंद अभ्यासकांनी केली आहे.

रां ची. ढेरे यांच्या मते या मूर्तीच्या शिरोविहिनतेसाठीच परशुराम कथा निर्माण करण्यात आली.

परशुराम (मातृवध) कथा हि खोटी आहे हे उघड आहे. उत्तर पूराणम या जैन ग्रंथाने हे स्पष्ट होते. या जैन ग्रंथानुसार रेणुका हि जमदग्नी ऋषीच्या मृत्यूपर्यंत जिवंत होती.

या शिरोहिन मूर्तींना वैदिक आश्रय (खरे तर अतिक्रमण) देण्यासाठी रेणुकेच्या शिरेच्छेदाची कथा रचण्यात आली.
आज या कथेमुळे अश्या बर्याच शिरोहिन असलेल्या मुरत्यांची ठिकाणं रेणुका या नावाने ओळखली जातात.

गजमुख प्रतिकाला वैदिक आश्रय देण्यासाठी गणपती शिरच्छेदाची कथा रचली गेली. व तो पुढे गजानन म्हणून ओळखला गेला. शिवाने खरचं पार्वतीच्या बाळाची हत्या केली असे आपण म्हणत नाही.

लिंगपूजेचेही तसेच आहे. लिंगपूजेला वैदिक आश्रय देण्यासाठीच शिवाच्या लिंग संबधी कथा निर्माण करण्यात आल्या. (तसही सर्व लिंग हे शिवाची प्रतीक मानली जात नाहीत. बैल नसलेल्या पिंडीची पूजा वर्ज्य मानली गेली आहे)

लिंगपूजा हि आदिमसमाजाची प्रतीक होती. शिवमूर्तीत आज नाग हे प्रतीक असते. किंबहुना नाग हे प्रतीक असेल तर हि मूर्ती शैवांची असा म्हणण्याचा प्रघात आहे. सिंधू संस्कृतीत मिळालेल्या शिवाच्या मूर्तीत कोठेही नाग (इतर प्राणी आढळतात) आढळत नाही. नागांचा व लिंगांचा संबंध उत्तर काळात शिव आणि विष्णू या दोघांशी जोडला गेला.

संस्कृत भाषा हि देवांची म्हणजेच आर्यांची मानली जाते. पाणिनीने हि भाषा (व्याकरण) लिहिताना जी चौदा सूत्रे तयार केली ती त्याला शंकाराकडून मिळाली म्हणून त्या सूत्राना माहेश्वर सूत्र म्हणतात.

आर्यांची भाषा त्यांना त्यांच्या पूर्वजाकडून म्हणजे शिवाकडून मिळाली हे सांगणं स्वाभाविकच आहे.

थोडेसे विषयांतर :-

रा. ना. दांडेकर आणि अन्य मान्यवरांच्या मते जैन व बौद्ध धर्माचा उगम हा वेदपूर्व अनार्य काळात झालेला असल्याचे म्हटले आहे.

अशोकाने कनकमुनी बुद्धाच्या स्तूपाची दुरुस्ती केल्याची नोंद इतिहासात आहे. अस जर असेल तर गौतम बुद्धापूर्वी बुद्ध परंपरा असण्याची शक्यता आहे.

जैनांची परंपरा देखील २४ तिर्थंकार मानते. त्यातला वृषभ नाथ हा शिव असून त्याला तीर्थांकर म्हटले गेले आहे कारण तो त्यांचा पूर्वज होता (जोतिप्रसाद जैन यांनी ऋषभनाथाला अंतिम मनू आणि प्रथम मानव म्हटलेलं आहे) पण जैनांचा चातुर्याम धर्म (तपश्चर्या, चोरी पासून विरती, अहिंसा, सत्य वचन) वृषभदेवाने सांगितलेला नाही अशी स्पष्ट नोंद जैन ग्रंथाने केलेली आहे. परंतु त्यानंतर दुसऱ्या तीर्थांकार पासून चातुर्याम धर्माची स्थापना झाली आहे आणि हा काळ सिंधू संस्कृतीचाच आहे.

जैन-बौध्दांबद्दल एका वेगळ्या लेखात सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न करिन.

रा.ना.दांडेकर आणि अन्य मान्यवरांची मते जर खरी असतील तर आर्य-अनार्य प्रमाणे जैन व बौद्ध या धर्माचा उगम देखील सिंधू संस्कृतीतच मानावा लागेल.

संदर्भ :-

१ मूर्तिविज्ञान - डॉ. गणेश हरी खरे

२ भारतीय मूर्तिशास्त्र - डॉ. नीळकंठ पु. जोशी

३ रिडल इन हिंदूइजम - डॉ. आंबेडकर

४ हिंदी संस्कृती आणि अहिंसा - धर्मानंद कोसंबी

५ बळिवंश - डॉ. आ. ह. साळुंखे

६ परशुराम : जोडण्याचे प्रतीक कि तोडण्याचे ? :- डॉ. आ. ह. साळुंखे

७ प्राचीन भारतातील नाग - एच. एल. कोसारे

८ शुद्र पूर्वी कोण होते ? - डॉ. आंबेडकर

९ लज्जागौरी - रां. ची. ढेरे

१०  वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी - डॉ. आ. ह. साळुंखे

११ महार फोक - अलेक्झांडर रॉबर्टसन

१२ दास-शुद्रांची गुलामगिरी खंड १ : भाग १ - कॉ. शरद पाटील

१३ हिंदू धर्म आणि तत्वज्ञान - स.अं. डांगे

१४ वि. रा. शिंदे लेखसंग्रह

Comments

Popular posts from this blog

१.महार

महार

भंडारी समाजाचा इतिहास