सत्यशोधक विचारांचे पाईक कॉम्रेड शरद पाटील
सत्यशोधक विचारांचे पाईक कॉम्रेड शरद पाटील
लाल सलाम अमर रहे !
मार्क्सवादी तसेच सत्यशोधक विचारांचे पाईक, जातीव्यवस्थेविरोधात प्रखर लढा देणारे ज्येष्ठ विचारवंत, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, प्राच्यविद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील यांचे नुकतेच निधन झाले. १७ सप्टेंबर १९२५ रोजी जन्मलेल्या पाटील यांनी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत सत्यशोधक कार्य, पुरोगामी विचारांची चळवळ आणि लिखाण अविरतपणे सुरू ठेवले. दलित, आदिवासी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांच्या माध्यमातून वाचा फोडली.विपूल अशी ग्रंथसंपदा हे कॉ. शरद पाटील यांचे एक वैशिष्टय़े. त्यांचे वैचारिक साहित्य अवघ्या जगाचे लक्ष वेधणारे ठरले. दास शुद्रांची गुलामगिरी हा खंड अधिक गाजला. अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, मार्क्सवाद फुले-आंबेडकरवाद, जाती व्यवस्थापक सांमती सेवकत्व, जात्यंतक भांडवलदारी, लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती, शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण ? महंमदी ही ब्राह्मणी, या त्यांच्या ग्रथांनी केवळ साहित्य विश्वात नव्हे तर, सामाजिक क्षेत्रातही वादळ उठविले. एक महाप्रज्ञावंत, एक महालढाऊ, एक थोर विचारवंत, संघटक आणि इतिहासाला ताजेतवाने डोळे देणारा, त्याच्या डोळ्यांतील विषमतेचे मोतीबिंदू काढणारा प्रज्ञावंत गेल्याने मोठी हानी झाली आहे. अश्या बहुजन वादी लेखकाला त्यांच्या विचारांना व कार्याला विनम्र अभिवादन ! त्यांना विविध विचारवंतांनी वाहीलेली ही आदरांजली.
====================================================================
===============================================================
इतिहासाला नवदृष्टी देणारा प्रज्ञावंत - उत्तम कांबळे
सोमवार, 14 एप्रिल 2014 - 03:15 AM IST
कॉ. शरद पाटील (शपा) म्हणजे लढ्याचा धगधगता अग्निकुंडच. आपल्या लढ्याचे तत्त्वज्ञान त्यांनी स्वतः बनवले होते. प्राच्यविद्यापंडित असलेल्या शरद पाटील यांनी थेट काशीत जाऊन वेद, संस्कृतचा अभ्यास केला होता. या अभ्यासाच्या जोरावर ते पार वेदपूर्व काळात घुसले. इतिहासात ज्यांना जागा नाकारल्या होत्या, अशा सर्वांना त्यांच्या त्यांच्या जागा देऊन त्यांना नायक नायिका बनवले होते. इतिहास घडवणारे आणि नायक बनणारे यांच्यात सातत्याने पडत जाणारे अंतर त्यांनी विचारांच्या आणि संघर्षाच्या जोरावर पुसून काढले होते. इतिहासाशिवाय फिरणाऱ्या बहुजन समाजाला मोठ्या गौरवाने त्यांचा त्यांचा इतिहास दिला होता. इतिहास म्हणजे केवळ लढाया आणि त्यांचे निकाल नसतात, तर याशिवायही बरेच काही घडत आलेले असते. इतिहासकार केवळ मैदानावर शस्त्रांचा खणखणाट ऐकत राहतात; पण कॉम्रेड शरद पाटलांसारखे इतिहासकार रणमैदानांचा, युद्धांचा जन्म जेथे होतो, त्या मानवी मनापर्यंत पोचतात.
कॉ. पाटील सत्यशोधक विचारांचे निखारे घेऊन जन्माला आले आणि तेच घेऊन ते फिरू लागले. आपापल्या भागात झालेल्या शेतकरी संघर्षात, श्रमिकांच्या संघर्षात भाग घ्यायला त्यांनी सुरवात केली. कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला तेव्हा बाहेर संघर्ष भरात आले होते. त्यांनी पाटील यांनाही खुणावले. पाटलांनी कॉलेजचा त्याग केला आणि थेट दाखल झाले ते कम्युनिस्ट पक्षाच्या तंबूत. चित्रांच्या माध्यमातून ते या चळवळीचे काम करत होते. डाव्या आणि क्रांतिकारी विचारांशी नाळ बांधून घेत होते. कुणाचा विश्वास बसू नये एवढा प्रचंड अभ्यास त्यांनी केला. वेदपूर्वकाळ, रामायण, महाभारत, वेद, पुराणे, बुद्ध, मार्क्स, फुले, आंबेडकर हे सारे त्यांच्या अभ्यासाचे विषय राहिले. अभ्यासानंतर ते वर्णन करत राहिले नाहीत, तर बॉंबगोळा अंगावर पडावा त्याप्रमाणे निष्कर्ष काढत राहिले. समकालीन विचारवंतांसमोर शड्डू ठोकत राहिले.
प्रचंड विद्वत्ता, प्रचंड संशोधन, प्रचंड कष्ट, प्रचंड लढाया यामुळे देशभर आणि देशाबाहेरही ते लौकिक पावले. दास-शूद्रांची गुलामगिरी, अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, मार्क्सवाद, फुले-आंबेडकरवाद, बुद्ध आदी विषयांवर पाटील कोणते भाष्य करतात, हे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. याच विचारातून त्यांची मार्क्सवाद्यांशी टक्कर झाली आणि त्यांनी स्वतःचा सत्यशोधक पक्ष काढला. बुद्ध संस्कृतीतल्या सौतांत्रिकशी नाते जोडले. मार्क्स आणि सौतांत्रिक यांचे हात हातात देऊन नवा विचार मांडला. व्यवस्था बदलायची असेल तर तळातून हादरे द्यावे लागतात, या भूमिकेतून त्यांनी आदिवासींचे संघटन केले. त्यांच्यात हे सर्व नवे क्रांतिकारी विचार बिंबविण्याचा प्रयत्न केला. या सत्यशोधकी विचारधारेतून शेकडो कार्यकर्ते, अभ्यासक त्यांनी तयार केले. ऐंशीनंतरचा काळच असा सुंदर होता की, सेवाभावी वृत्तीची आणि सामाजिक जाणिवांची पिढीच्या पिढी धुळे, नंदुरबारकडे पाटील यांना शोधत फिरायची. बहुजन समाज हा नावाप्रमाणेच मोठा असला तरी त्यातल्या फटीही मोठ्या आहेत हेही कॉ. पाटील यांना उमजले होते. या फटी बुजविण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम आखले. "दलित-आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन' त्यापैकी एक. व्यवस्था बदलता येते हे त्यांनी कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न केला. लेखन, भाषण, प्रकाशन, संघटन आदी सर्व मार्ग वापरून ते चळवळी चालवत होते. कार्यकर्ता नुसताच घाम गाळणारा नव्हे तर विचार करणारा, प्रज्ञावंत असावा, यासाठी ते स्वतः खूप कष्ट घेत. अभ्यास शिबिरात ते एकटेच सहा-आठ तास बोलत. निऋर्ती ही वेदपूर्वक काळातील लोकशाहीवादी राणी होती हे त्यांनी शोधून काढले आणि महिला मुक्तिवाद्यांना मोठे बळ मिळाले. त्यांच्या तालमीत तयार झालेल्या नजूबाई गावित यांचे "अघोर' नावाचे आत्मचरित्र आले आणि पुन्हा व्यवस्था हलली. धुळ्यातून कधी कोणता गोळा कुणावर फुटेल, याचा नेम राहिलेला नव्हता. परखड स्वभाव, अभ्यासातून आलेली मते आणि इतिहासाच्या हातात नवी मशाल देण्याची धडपड यामुळे त्यांना वैचारिक शत्रू कमी लाभले अशातला भाग नाही किंवा त्यांनी स्वतःहून कुणाला खोडले नाही, अशातलाही भाग नाही. सीता, द्रौपदी, कर्ण, शंबूक, एकलव्य आदी अनेक नायक-नायिका महाकाव्यामध्ये दुर्लक्षित होते. या सर्वांची नाळ त्यांनी मानव मुक्तीशी, स्त्री मुक्तीशी, आत्मसन्मानाच्या संघर्षाशी जोडली. नायक-नायिकांच्या रूपात त्यांना पुढे आणले. वर्ग, जाती आणि स्त्री दास्य हे सर्वांत मोठे शत्रू आहेत. त्यांना पराभूत केल्याशिवाय समताधिष्ठित समाज निर्माण होणार नाही, याची त्यांना खात्री होती. मार्क्स आणि आंबेडकर ही नावे एकत्र घेणे म्हणजे जणू काही त्या काळात आणि आजही काही प्रमाणात गुन्हाच आहे. अशा काळात मार्क्सवादाला बुद्धकाळात नेऊन डाव्यांना तर त्यांनी हादराच दिला होता. एक महाप्रज्ञावंत, एक महालढाऊ, एक थोर विचारवंत, संघटक आणि इतिहासाला ताजेतवाने डोळे देणारा, त्याच्या डोळ्यांतील विषमतेचे मोतीबिंदू काढणारा प्रज्ञावंत गेल्याने मोठी हानी झाली आहे.

उत्तम कांबळे
साभार - http://www.esakal.com/Tiny.aspx?K=M6FJN
===============================================================
===============================================================
'योध्दा' संशोधक!
इतिहास मरत नसतो; चुकीच्या आकलनातून तो प्रेरक न बनता बाधक बनतो, ही भूमिका घेऊन भारताच्या इतिहासाची युगप्रवर्तक पुनर्मांडणी करणा-या कॉम्रेड शरद पाटील यांना अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचा पहिला वा. सी. बेंद्रे (बेंद्रेंनी अब्राह्मणी इतिहास लेखनाचा प्रवाह मराठ्यांच्या इतिहास लेखनात विकसित केला.) पुरस्कार जाहीर झाला. ही महत्त्वाची घटना आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या संशोधनाला अॅकॅडेमिक मान्यता मिळत आहे. गेली 40 वर्षे एक ‘जीवनदायी कार्यकर्ता’ म्हणून संशोधन आणि चळवळ या दोन्ही क्षेत्रांत अखंडपणे कार्यरत असणा-या शरद पाटलांना अवहेलना, द्वेष आणि मानहानी सहन करत अत्यंत एकाकी प्रवास करावा लागला. हा प्रवास कोणत्याही वैचारिक तडजोडीशिवाय झाला असल्याने एक ‘जैविक विचारवंत’ ही त्यांची ओळख कोणालाही पुसता येणार नाही.
बडोद्याचे ‘जागृति’कार भगवंतराव पाळेकर नात्याने आजोबा, तर वडील धुळे जिल्ह्यातील पहिल्या पिढीतील सत्यशोधक होते. यामुळे घरातच सत्यशोधकी विचारांचे संस्कार त्यांच्यावर झाले. 1964-65च्या चीन युद्धादरम्यान तीन वर्षे स्थानबद्धतेत तुरुंगात असताना त्यांनी मार्क्सचा ‘कॅपिटल’ हा महाग्रंथ समजून घेतला. या ग्रंथाच्या दुस-या खंडातील मार्क्सने सोडविलेले एक गणित चुकीचे असल्याचे त्यांनी कॉ. बी. टी. रणदिवेंना पत्राने कळवले. ‘मार्क्स चुकला आहे, इतक्या खोलवर विचार कुणी केला नाही’, असे उत्तर आले. मार्क्सही चुकू शकतो, हे सांगत त्यांनी मार्क्सभक्तीचे झापड बाजूला सारले. भारतीय समाज आणि इतिहास हा फक्त मार्क्सच्या मदतीने समजून घेता येणार नाही, याची खात्री पटल्याने त्यांनी स्वतंत्र लेखन करण्याचे ठरवले. यासाठी वैदिक वाङ्मय मुळातून वाचायचे आणि त्यासाठी वैदिक संस्कृत शिकायचे, या हेतूने 1966मध्ये ते बडोद्याला गेले. इतिहास हा नेहमीच सांस्कृतिक राजकारणातील महत्त्वाचे शस्त्र म्हणून पुरोगामी आणि प्रतिगामी अशा दोन्ही गटांकडून वापरला जाणार; परंतु अँतोनिओ ग्रामसी ज्यांना ‘वंचित’ म्हणतो, त्या सर्वहारांचा सशक्त इतिहास भक्कम पुराव्यांच्या आधारे पुढे आणून सांस्कृतिक राजकारणाची लढाई लढण्यासाठी आवश्यक ‘सांस्कृतिक भांडवल’ शरद पाटलांच्या इतिहास संशोधनातून सर्वहारांकडे उपलब्ध आहे. म्हणून शरद पाटील नेहमी म्हणतात, ‘मी समतावादी समाजाच्या उभारणीचे शस्त्रागार तयार केले आहे, त्याचा वापर नव्या पिढीने करावा.’ शरद पाटलांनी इतिहासाला काय योगदान दिले, याचे उत्तर असे की, त्यांनी इतिहासाच्या पुनर्मांडणीसाठी आवश्यक नव्या संकल्पना, अन्वेषणशास्त्र आणि माफुआ ते सौतांत्रिक भौतिकवाद असे सैद्धांतिक योगदान दिले. राम आणि कृष्ण यांची भारताच्या इतिहासातील भूमिका, भारतातील आद्य स्त्रीसत्ताक गणराज्यांचे ऐतिहासिक महत्त्व, असे अनेक मूलभूत विषय त्यांनी सैद्धांतिक मांडणीत केंद्रस्थानी आणले. इतिहासाला बुद्ध, दिग्नाग, धर्मकीर्ती ते फुले-आंबेडकरांचे असणारे योगदान सैद्धांतिक पातळीवर मांडण्याचा बहुधा पहिला यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. भारतीय इतिहासातील अब्राह्मणी ज्ञानशाखेची असणारी भक्कम परंपरा हजारो वर्षांचा भारताचा इतिहास नव्या परिप्रेक्ष्यात मांडून त्यांनी पुढे आणली. 1957 ते 1971 अशी 14 वर्षे संशोधन करून ‘दासशूद्रांची गुलामगिरी’ हा बुद्धकाळापर्यंतचा इतिहास ग्रंथ त्यांनी लिहिला. ‘जातिव्यवस्था व सामंती सेवकत्व’ हा तुर्काच्या काळापर्यंतचा इतिहास लिहिला. दिग्नाग स्कूलचे सौतांत्रिक विज्ञानवाद व अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र ही जाती व्यवस्थान्तक संघर्षाची अन्वेषण पद्धती वापरून ‘जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती’ हा ग्रंथ प्रकाशित केला. तर, या महाप्रकल्पातील शेवटचा खंड ‘निऋती व हरिती यांची स्त्री राज्य ते भारताचा समाजवाद’ प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. शिवाजी-संभाजीची सर्वाधिक चिकित्सा धर्मकेंद्री झाली आहे. ती तशी का झाली, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. परंतु, या चिकित्सेतून शिवाजी-संभाजीच्या ऐतिहासिक योगदानाला योग्य न्याय मिळाला नाही. पाटलांनी त्यांच्या ‘शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण-महंमदी की ब्राह्मणी?’ या बहुचर्चित मौलिक ग्रंथात जातकेंद्री अन्वेषण पद्धतीद्वारे या दोघांचे समतावादी समाज उभारणीतील मौलिक योगदान पुढे आणले.
या पुस्तकाने अनेक प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रातील प्रस्थापित इतिहास लेखनासमोर कडवे आव्हान उभे केले. महाराष्ट्राची अस्मिता असणा-या शिवाजीच्या वस्तुनिष्ठ आकलनाच्या शक्यता त्यातून स्पष्ट झाल्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळींची चिकित्सा करताना ते म्हणतात, ‘महाराष्ट्रात ब्राह्मणेत्तर चळवळीत पुढाकार घेणा-या कुणबी जातींनी, जातिव्यवस्था विरोधाला तिलांजली देऊन राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे आणि प्रमुख अस्पृश्य जात, आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जातिव्यवस्था विरोधार्थ स्वतंत्रपणे संघटित झाल्यामुळे कुणबी जात व ही अस्पृश्य जात यांची विरोधी एकजूट पुन्हा वैमन्यसभावी बनली.’ त्यांचा हा निष्कर्ष आज परिवर्तनवादी चळवळी क्षीण का होत आहेत, याचे उत्तर देतो. याबरोबरच ‘अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ या ग्रंथाने संस्कृतीतील सौंदर्यशास्त्राचे स्थान मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या संदर्भांत अधोरेखित केले. मराठी साहित्याला स्वत:चे स्वतंत्र सौंदर्यशास्त्र नाही. म्हणूनच हे सौंदर्यशास्त्र दिग्नाग आणि धर्मकीर्ती यांसारख्या बौद्ध दार्शनिकांच्या सौंदर्यशास्त्रीय योगदानाशी नाते जोडत ग्रामीण दलित आदिवासी साहित्यातील समन्वयातून उभारण्याचा आग्रह त्यांनी धरला. त्यांनी वर्गजातिस्त्रीदास्यांताच्या लढ्यांना अग्रक्रमाने समजावून घेत माफुआ अन्वेषण पद्धतीने वासाहतिक काळ आणि एकूणच भारतीय इतिहास याकडे पारंपरिक मार्क्सवादी अभ्यासकापेक्षा वेगळ्या आणि बहुपर्यायी दृष्टीने पाहिले. याचे कारण असे, की फक्त मार्क्सवाद, फुलेवाद किंवा आंबेडकरवाद हे दृष्टिकोन स्वतंत्रपणे वापरल्यामुळे समाजाच्या आकलनावर मर्यादा येतात. त्याऐवजी मार्क्स, फुले आणि आंबेडकरांचा समन्वय साधणारी बहुप्रवाही ‘मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद’ ही अन्वेषण पद्धती अधिक व्यापक आणि सर्वस्पर्शी असल्याने या पद्धतीची अनिवार्यता पाटील सातत्याने मांडत आले आहेत. या अन्वेषण पद्धतीमध्ये ते ब्राह्मणी/अब्राह्मणी या कोटीक्रमांचा वापर करतात. संस्कृत, प्राच्यविद्या आणि तत्त्वज्ञान या तिन्ही शाखांचा व्यासंग आणि सर्वहारांच्या चळवळीतील रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी घेतलेला अनुभव यामुळे त्यांच्यातील इतिहास संशोधकाची दृष्टी अधिक व्यापक, मूलगामी झाली आहे. त्यांच्या मते, ‘बुद्धाचा धम्म वर्ण व्यवस्था अंताच्या संदर्भांत क्रांतिकारक होता. पण आंबेडकरांनी त्याला सर्व विषमता अंताच्या संदर्भांत क्रांतिकारक मानला.’ शरद पाटलांचा हा सिद्धांत समकालीन दलित चळवळींच्या संदर्भांत तपासला असता, दलित चळवळ जातीअंताचा प्रश्न आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे हाताळण्यामध्ये का अपयशी ठरत आहे, याचे उत्तर मिळते. त्याचप्रमाणे धर्मांतराने जातीअंताचा प्रश्न सोडवण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न अपुरा का ठरला, या प्रश्नाचे आकलन होते. ‘जात’ हा घटक केंद्रस्थानी ठेवून आधुनिक भारताचे जे इतिहासलेखन शरद पाटील यांनी केले आहे, त्यातून अनेक नवीन तपशील व अन्वयार्थ पुढे येतात. शरद पाटील लिहितात की, ‘फुले या शूद्राने व आंबेडकर या अतिशूद्राने व्यक्तिस्वातंत्र्याचा निकराने पाठपुरावा केला, याचे कारण जात्यन्ताची चळवळ व्यक्तिस्वातंत्र्याशिवाय प्राप्त होऊ शकत नव्हती. फुले-आंबेडकरांनी म्हणून जात्यन्तानंतरच्या स्वातंत्र्याला राष्ट्रीय स्वातंत्र्यापेक्षा श्रेष्ठ मानले.’ अशा प्रकारे फुले आणि आंबेडकरांचा अग्रक्रम हा जात्यन्तक स्वातंत्र्याला होता, हे पाटील स्पष्टपणे नोंदवतात. आपण ‘दासशूद्रांची गुलामगिरी’ या ग्रंथाचे लेखन विधायक अब्राह्मणी अन्वेषण पद्धतीने केले आहे, असे सांगून पाटील म्हणतात की, अब्राह्मणी अन्वेषण पद्धतीचे जनक फुले असून तिचा विकास आंबेडकरांनी केला. माफुआ ही अन्वेषणपद्धती घेऊन शरद पाटील यांनी आधुनिक भारतातील इतिहासाच्या आकलनात महत्त्वाची भर घातली आहे. जात हा ‘स्वातंत्र्यलढा’ समजावून घेण्याचा महत्त्वाचा निकष आहे, असे मानून त्यांनी वासाहतिक काळाचे विश्लेषण केले आहे. शरद पाटील म्हणतात, ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा बाह्यसंघर्ष ब्रिटिश साम्राज्यशाही व हिंदी उच्चजातीय-वर्गीय राष्ट्रवादी, यांच्या नेतृत्वाखालील हिंदी जनता यांच्यातला असला, तरी आंतरिक संघर्ष उच्चजातीय, वर्गीय, राष्ट्रवादी व शुद्रातिशूद्र जातीय-वर्गीय, जात्यन्तवादी यांच्यातला होता.’ आज महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीत विविध ठिकाणी कार्यरत असणारे असंख्य कार्यकर्ते तसेच लेखक-विचारवंतांचा फार मोठा समूह असा आहे, जो त्यांचे लेखन वाचून, त्यांच्या अभ्यासवर्गातून, त्यांच्या चळवळीतून किंवा त्यांची व्याख्याने ऐकून घडला आहे. त्यांच्यामध्ये भारतीय लोकशाही क्रांतीचे स्वप्न रुजविण्याचे श्रेय कॉम्रेड शरद पाटील यांचे आहे.
दिनेश पाटील patildinesh04@yahoo.com
साभार-http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-on-sharad-patil-by-dinesh-patil-w-4557725-NOR.html
===============================================================
===============================================================
- साहित्य क्षेत्रातील सुवर्ण पान - साहित्यसूर्य कॉम्रेड शरद पाटील ●
खरे तर त्यांच्यासारखा "साहीत्यसूर्य" जरी मावळला असला तरी मावळण्यापुर्वी या सूर्याने आपल्या लेखणीच्या प्रकाशाने अनेक नवसाहित्यिकांसाठी साहित्य क्षेत्रातील प्रतिगामी अंधकार दुर करुन संशोधक वृत्तीचा सूर्योदय सुध्दा केला आहे.त्यांच्या लेखणीने दिलेले बळ इतके आहे की साहित्य क्षेत्रातील कोणत्याही संकटाचा मुकाबला करुन त्या संकटावर मात करण्याची पात्रता आमच्या अंगी आली आहे.
** कॉ.शरद पाटील यांचा परीवार **
कॉ.पाटील यांच्या पश्चात त्यांच्या शिक्षिका पत्नी सुशीलाबाई,आदिवासी लेखिका नजुबाई गावीत,मुलगा शिल्पकार समरद व नचिकेत तसेच मुलगी प्राध्यापिका सुजाता शिंदे आणि सुना,नातवंडे असा परिवार आहे.कॉम्रेड शरद पाटील यांच्या विचारांना आणि कार्याला शतशः प्रणाम करुन त्यांच्याविषयी चार शब्द...
|| कॉम्रेड शरद पाटील ||
** जीवनक्रम **
● कॉम्रेड शरद पाटील यांचा जन्म - 17 सप्टेंबर 1925 रोजी धुळे जिल्ह्यातील कापडणे तालुक्यात एका सत्यशोधक कुटुंबात झाला.● 1942 ला ते मेट्रिक उत्तीर्ण झाले.
● 1942-43 त्यांनी कलाभवन वडोदरा येथे चित्रकला शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेतला.
● 1943-45 मध्ये ते जे.जे.स्कुल ऑफ आर्ट ,बॉम्बे मधे दाखल झाले.
● 1945-47 मध्ये महायुध्दोत्तर पहिल्या देशव्यापी विद्यार्थी संपात ते सहभागी झाले.त्यानंतर शिक्षण सोडून ते कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयात चित्रकार म्हणून कार्यरत झाले.
● 1947-49 मधे त्यांनी ट्रेड युनियन फ्रंट,धुळे मधे काम केले.
● 1949-50 ते हद्दपार राहिले.
● 1951-56 त्यांनी शेतकरी चळवळीत काम केले.
● 1956 नंतर त्यांनी आदिवासी लोकांसाठी चळवळीत काम केले ते मृत्युपर्यंत.
● 1964 मध्ये कम्युनिस्ट पक्ष दुभंगल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले.
● 1966 मधे दोनदा तुरुंगवास भोगून सुटल्यानंतर बडोद्यात संशोधनासाठी व संस्कृत (पाणिनी) व्याकरण शिकण्यासाठी त्यांनी वास्तव्य केले.
● 1971-72 मधे त्यांनी "दास शुद्रांची गुलामगिरी" हा ऐतिहासिक ग्रंथ लिहला.
● 1978 मधे जाती व्यवस्थे विरोधात लढायला माकप ने नकार दिल्याने त्यांनी माकप चा राजीनामा दिला आणि मार्क्सवाद- फुले-आंबेडकर तत्त्वावर आधारलेला "सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष" त्यांनी स्थापन केला.
● 1982 ते 1993 पक्ष आपल्या पक्षाचे मुखपत्र "सत्यशोधक मार्क्सवादी" चे बारा वर्ष संपादन केले.
● 1987 मधे साक्री येथील दलित-आदिवासी-ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलन घेउन ते "नामांतर कृती समिती" मधे सहभागी झाले.
● 1994-95 त्यांनी "जातिव्यवस्थापक सामंती सेवकत्व, खंड 2" चे लेखन केले.
● मृत्यु - 11 एप्रिल 2014,धुळे.
** कार्य **
● गोतम बुध्दांनंतर Diloctical Logic ( तर्कशुद्ध युक्तिवादशास्त्र ) प्रथमच मांडणारे अत्यंत अभ्यासु जागतिक विचारवंत अशी त्यांची ओळख आहे.त्यांचे साहित्य अनेक देशी-विदेशी विद्यापीठांमधे "विश्वासु संदर्भ साहित्य" म्हणुन अभ्यासक्रमात वापरले जाते.● त्यांनी केलेल्या इतिहासाच्या मांडणीचे खंडन आजपर्यंत कुणालाच करता आले नाही.
● कॉम्रेड शरद पाटील यांनी महाराष्ट्र आणि भारताच्या विचार विश्वाला कलाटणी देणारी अतुलनीय अशी विचारसंपदा निर्माण केली.त्यांनी भारतीय इतिहासाची नव्याने मांडणी करून नवे सामाजिक आणि राजकीय संदर्भ निर्माण केले.
● मुळचे चित्रकार असणाऱ्या कॉ.पाटलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा संबंध डाव्या चळवळीशी आला,त्यानंतर आयुष्यभर त्यांनी पुरोगामीत्वाचा पुरस्कार केला.
● जातिव्यवस्था अंताच्या प्रश्नाला भारतीय राजकीय विचारधारेच्या केंद्रस्थानी आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले.
● भारतातील जवळपास बहुतेक सर्व नामवंत विद्यापीठांत वेगवेगळे शिबिर आणि सभांद्वारे त्यांनी प्रबोधन केले.
● प्राचीन भारताच्या इतिहास अभ्यासाची एक नवीसंशोधन पद्धती त्यांनी पुढे आणली.त्यांनी समाजात परिवर्तन करु इच्छिणाऱ्या नवलेखकांन नवविचारांची साधने दिली.भारतीय प्रबोधनाचे शस्त्रागार अभ्यासकांना दिले.जाती वर्चस्ववादी पितृसत्ताकता यांच्या प्रभावातून इतिहासलेखनास मुक्त करण्याचे महत्कार्य त्यांनी केले.
● शिवराय,मार्क्स,महात्मा फुले,शाहु महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे खरे वारसदार म्हणून त्यांनी साहित्य,धर्म,विचारप्रणाली आणि संस्कृती यांच्या संदर्भात नवे सिद्धांत मांडले.त्यांनी केलेली मांडणी इतकी अभ्यासपुर्ण आहे की त्या मांडणीचे खंडन एकाही परीवर्तन विरोधी गटाला करता येणार नाही.
● मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद आणि "दासशुद्रांची गुलामगिरी' अशा ग्रंथांतून आणि "सत्यशोधक मार्क्सवादी' या मासिकातून त्यांनी जातिव्यवस्थेचा प्रश्न सामाजिक चर्चेच्या आघाडीवर आणण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य केले.
● त्यांच्या "जातीय सामंती सेवकत्व' आणि "भांडवली लोकशाही क्रांती आणि तिची समाजवादी पूर्ती" यांसारख्या ग्रंथांच्या माध्यमातुन भारतातील लोकशाही क्रांतीची नवी कार्यक्रमपत्रीका त्यांनी पुढे आणली.
** चळवळी **
● कॉ.पाटलांच्या राजकीय कार्यामधील एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण चळवळींचा उगम त्यांच्या पासुन झाला.
● महाराष्ट्रातील पहिली धरणग्रस्तांची चळवळ उकाई धरणाच्या निमित्ताने त्यांनी यांनी उभी केली.
● आज आदिवासी भूमिहीनांसाठी शासनाने वनकायदा पुढे आणला आहे.त्या कायद्यासाठी भारतातील पहिली न्यायालयीन लढाई सुप्रिम कोर्टात कॉ.शरद पाटील आणि त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी लढली.त्यासाठी नंदुरबार,साक्रीच्या आदिवासींच्या जनचळवळींनी वनकायद्यासाठी आवश्यक ती पार्श्वभूमी उभी केली.
● आदिवासींचा आर्थिक लढा आणि नामांतराचा जातीविरोधी लढा यांच्या एकजुटीतून परिवर्तनासाठी संयुक्त चळवळ उभी करण्याचा पहिला प्रयत्न हा धुळे जिल्ह्यातून पुढे आला.
● शेतकऱ्यांच्या आर्थिक लढ्यात स्त्रीसमतावादी लढ्याची दिशा देण्यासाठी पिंपळनेर ते चांदवड असा स्त्रियांचा महामोर्चा सत्यशोधक कष्टकरी महिला सभेने संघटित केला.
● डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे याकरिता सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षातर्फे लॉंग मार्च काढून त्यांनी आदिवासींना नामांतराच्या चळवळीचा भाग बनविले.
● महाराष्ट्रातील साहित्य संमेलन चळवळींच्या सहभागातून संयुक्त साहित्य सभेची चळवळ धुळे जिल्ह्यातून उभी करण्याचे श्रेय देखील कॉ.शरद पाटील यांनाच जाते.साक्री येथे पहिले संयुक्त साहित्य संमेलन यशस्वी करून साहित्य संमेलन चळवळीला नव्या वळणावर आणण्याचे कार्य कॉ.पाटील आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी केले.
** ग्रंथसंपदा **
(A) खंड 1 -
भाग 1 व 2 दास-शुद्रांची गुलामगिरी ( इंग्रजी व मराठी )
भाग 3 रामायण-महाभारतातील वर्ण संघर्ष - शंबुक,एकलव्य,सीता,कर्ण,द्रौपदी,विधुर,कृष्ण
(B) खंड 2 -
भाग 1
जातिव्यवस्थापक सामंती सेवकत्व (इंग्रजी व मराठी)
भाग 2
शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण महंमदी की ब्राह्मणी ?
(C) खंड 3 -
जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती (इंग्रजी व मराठी),
(D) खंड 4 -
प्रिमिटिव्ह कम्युनिझम,मातृसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद (इंग्रजी व मराठी)
Caste Feudal Servitude खंड 2
** काही महत्वाची पुस्तके **
● अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र● मार्क्स - फुले - आंबेडकरवाद
● भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत
● बुद्ध - भारतीय इतिहासातील लोकशाही,स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्त्रोत
● पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका
● स्त्री शुद्रांच्या स्वराज्याचा राजा (नाट्यसंहिता)
● शोध,मूलनिवासींचा की शूद्र वर्णाचा की जात्यंतक समतेचा ?
● नामांतर - औरंगाबाद आणि पुण्याचे
● बुद्ध
● भिक्खू आनंद
● धम्म आनंद
● वधू विशाखा.
** पुरस्कार **
● कॉ.शरद पाटील यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या अत्यंत भरीव योगदानाबद्दल त्यांना 10 एप्रिल 2014 रोजी 18वा "महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार" जाहीर झाला.वाई या ठिकाणी हा पुरस्कार त्यांच्या मानसकन्येने स्विकारला.● अलीकडेच त्यांना महाराष्ट्र इतिहास संशोधन परिषदेच्या "महान इतिहासकार पुरस्कार" ने सन्मानित करण्यात आले.
● कॉ.शरद पाटील यांना नुकताच इतिहासकार "वा.सी. बेंद्रे पुरस्कार" प्रदान करण्यात आला.याशिवाय त्यांच्या साहित्याचा अनेक ठिकाणी गौरव झाला आहे..
अशा महान साहित्यिकास मानाचा मुजरा..!!
लेखक - अनिल माने, इंदापूर,पुणे.
साभार-http://sharadpatilcomrade.blogspot.in/
साभार-http://sharadpatilcomrade.blogspot.in/

Comments
Post a Comment