Skip to main content

शूद्र

शूद्र

शुद्र शब्द ऋग्वेदात एकाच ठिकाणी आढळतो. त्यातही प्रक्षिप्त मानल्या गेलेल्या पुरुषासुक्ताच्या भागात.

डॉ. आंबेडकरांनी शुद्र हा सुरुवातीपासून चौथा वर्ण नव्हता व शुद्र हे क्षत्रिय वर्ण चे होते हे साधार स्पष्ट केले आहे.

शुद्र हा शब्द एका जमातीचे किंवा टोळीचे विशेषनाम म्हणून वापरलेले आहे. सिकांदराबरोबर ज्या टोळीने युद्ध केले त्यात जी सोदरी नावाची टोळी होती. तीच  शुद्र टोळी असा लॅसेन या ग्रंथकाराने हवाला दिलेला आहे.

विष्णू पुराण, मार्कंडेय पुराण, आणि ब्राह्म पुराण यात शुद्रांची टोळी अनेक टोळ्यांपैकी एक स्वतंत्र टोळी असून विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील प्रदेशात ती राहत असे.महाभारतातील सभापर्व ३२ व्या अध्यायात शुद्रांची प्रजासत्ताक राज्ये आढळतात

( शुद्र पूर्वी कोण होते ?)


या शुद्र टोळीत पुरातन काळी पैजवन नावाचा राजा होऊन गेला असल्याचा उल्लेख महाभारतात आलेला असून ऋग्वेदातील सुदास हाच पैजवन राजा होय हे डॉ.आंबेडकरांनी व प्रो. वेबर यांनी मांडलेलं आहे.

सुदासाचा संबंध पुरु गटाशी असून त्याची वंशावळी आपल्याला विष्णू पुराणात पाहायला मिळते.

पुरु टोळी हि आर्य होती. याबद्दल संशय नाही. पण कोसंबी व शरद पाटील यांसारखे विद्वान सुदासाला दास समजतात. जर सुदास दास असेल तर त्याला अनार्य मानावे लागेल. परंतु त्याची जी वर्णने वेदात येतात त्यानुसार तरी तो आर्य ठरतो.

तो आर्य कि अनार्य हे ठरवण्याआगोदर काही मुद्द्यांचा आपण विचार करूया.

शुद्र या शब्दाचा अर्थ आपण आधी समजून घेतला पाहिजे. शुद्र या शब्दाचा मूळ अर्थ होतो शुचदा: म्हणजे पवित्र केलेला किंवा पवित्र करून घेतलेला असा आहे.

सुदासाचे वडील दिवोदास याला पुरु टोळीच्या बध्रयाश्वाने दत्तक घेतल्याचे वर्णन ऋग्वेदात (९-६१-२) आलेले आहे. त्यामुळेच शुद्र हा शब्द दिवोदास व सुदासाच्या वंशजाना लावला गेला.

शुद्र व अभिर (अहिर) हे एकच लोक होत असा अभिप्राय पतंजली याने दिला आहे. त्यामुळे शुद्र हे सुदासाच्या वंशातील असून मूळचे नाग गणाचे लोक होते.

नागांना व्रात्यस्तोम यज्ञाद्वारे पवित्र करून आर्य करण्यात येत असे. असेच व्रात्यस्तोम यज्ञाने पवित्र करून बाध्रयाश्वने दिवोदासाला दत्तक घेतले होते. त्याच्याच पुढील पिढया शुद्र नावाने ओळखल्या गेल्या.

पुढील काळात शुद्रांचे जे प्रकार शास्त्रकारांनी केलेले आहेत. ते म्हणजे निरवासीत शुद्र व अनिर्वासित शुद्र. आर्य धर्माच्या कक्षेत आलेले शुद्र व आर्य धर्माच्या कक्षेत नसलेले शुद्र.

शूद्रांना सुरुवातीच्या काळात तरी इतर आर्याप्रमाणे सर्व अधिकार होते. म्हणूनच तर सुदास हा वेदातील सर्वात मोठा राजा म्हणून आपणास पाहायला मिळतो.

शुद्रांची अधोगती हि ब्राह्मण आणि शुद्र संघर्षांपासून सुरु होते. याची सुरुवात वासिष्ठाने केली असल्याचे दाखले वैदिक वाङ्मयात आहे.

ऐतरेय ब्राह्मण या ग्रंथात श्यापर्ण ब्राह्मणाची जी कथा आली आहे. त्या कथेत पुरातन काळच्या चार उदाहरणांपैकी एक उदाहरण वसिष्ठ आणि सुदासाचे आहे. त्यात खोट्या कथा सांगून वासिष्ठाने सुदासाला यज्ञात सोमाऐवजी वडाच्या पारंब्याचा रस पाजला होता हे मान्य केले आहे. यज्ञात सोम हे पेय फार पवित्र मानलेलं असून त्यापासून राजा सुदासाला अलिप्त ठेवणं हा खरंतर सुदासाचा अपमानच होता.
आणि इथूनच वसिष्ठ व सुदासाचा संघर्ष होतो. सुदास वसिष्ठाला पुरोहित पदावरून हटवतो व विश्वामित्राला पुरोहित म्हणून स्थानापन्न करतो. पुढे हा संघर्ष पिढ्यानपिढया चालताना आपणाला दिसतो.

हा संघर्ष ब्राह्मण व क्षत्रियातील शुद्र यांमधील संघर्ष होता. इतर क्षत्रियांनी या संघर्षात न उतरण्याचे कारण दिवोदास हा दत्तक पुत्र होता व मूळचा नाग गणांचा होता. त्यामुळेच ब्राह्मण शुद्र संघर्षात शुद्र एकाकी पडले व डॉ. आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे ते उपनयन अधिकाराला पारखे होऊन अधोगतीला गेले. ब्राह्मणांनी त्यांच्यासाठी अनेक जुलमी कायदे लादले व सुदासाच्या शूर अश्या वंशाना देशोधडीला लावले.

Comments

Popular posts from this blog

प्राचीन भारताचा इतिहास - भाग २

विठोबा

Comments

Popular posts from this blog

१.महार

महार

भंडारी समाजाचा इतिहास