बाजींद

बाजींद भाग १

बहिर्जी नाईक यांची कहाणी | बाजींद भाग १

बहिर्जी नाईक यांची कहाणी | बाजींद भाग १.

बहिर्जी नाईक यांची कहाणी – 

रायगड च्या डोंगरदरीत “धनगरवाडी” हे खुप जुने गाव. सखाराम चा जन्म याच गावचा.


शिवाजी महाराजांनी रायगड स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला आणि आसपास च्या छोट्या छोट्या खेड्यांचं सोनं झाला.जीवन स्थिर झालं.

 नाहीतर कोण कुठला विजापूर,दिल्लीचा बादशहा कुठल्या सरदाराला पाठवून गावाची राखरांगोळी करेल सांगता येत नव्हते.

रायगड किल्ल्यावर “टकमक” टोक नावाचा एक प्रचंड सुळका आहे,या सुळक्यापासून खाली हजारो फूट खोल दरी असायची. स्वराज्याशी हरामखोरी करणारे फितूर याच टोकावरुन खाली पाताळात ढकलून दिले जायचे.


टकमकाच्या बरोबर खाली बाजूच्या १० कोसावर दाट जंगलात धनगरवाडी हे गाव. 

स्वराज्याशी फितुरी करणारे हरामखोर टकमकावरून खाली फेकले जायचे तेव्हा हजारो फूट खाली धनगरवाडी जवळ पडायचे.

अक्षरश चिखल व्हायचा त्यांच्या देहाचा..!


काही दिवस कोलह्या कुत्र्यांची मेजवानी झाली,पण जंगली जनावरांचा सुळसुळाट झाला त्या मुळे..!


जंगलातील जनावरं माणसाच्या रक्ताला चाटवली आणि मग जेव्हा टकमकावरून कोणी हरामखोर खाली येईना, त्यावेळी भुकेने कासावीस असणारी जनावरे शेजारच्या धनगरवाडीत हल्ले करु लागली..!


शे दोनशे घरट्यांचे गाव त्यामुळे भयभीत झाले. 

मग गावचा कारभारी असलेला सखाराम हे गाऱ्हाणे घेऊन रायगडावर सरकारी दफ़्तरी सांगायला जायला निघाला

सोबत पाच दहा जोडीदार सोबत घेऊन दिवस उगवायला घरातून बाहेर पडायच्या बेतात होता.

👉सखाराम च्या दोन बायका होत्या,राधिका आणि अंबिका. 

दोघींचा पण सखाराम वर जीव होता.

 राधिकेला मूल बाळ नसल्याने पाचाड पलीकडच्या धनगरवाडी वरच्या नातलगांची मुलगी अंबिका त्या घरात सखाराम ची कारभारीन बनून आली.

अंबिका ला मुलगा झाला.

वंशाला दिवा झाला म्हणून आवडीने बाळकृष्ण नाव ठेवले. 

शिवाजीराजे रायगडावर राज्याभिषिक्त झाले त्याच दिवशी बाळकृष्णाचा जन्म झाला म्हणून सारी धनगरवाडी हरखून गेली होती.

बाळकृष्णाला बाळ्या म्हणून सगळी हाक मारत होती. 

बघता बघता बाळ्या ७ – ८ वर्षाचा झाला होता. 

बाळ्याचे वडील सखाराम अंगापिंडांने मजबूत गडी. शेजार च्या वाड्या वस्त्यात सर्वांच्या मदतीला धावून जाणारा सखाराम कारभारी म्हणूनच काम करत होता. 

गावातील सारे लोक धनगर.

मेंढ्या,शेळ्या चरायला नेणे,कोंबड्या पाळणे,जंगलातून लाकूड तोडून आणणे हा सर्वांचा प्रमुख उद्योग. 

गावातल्या ज्या कुटुंबाकडे शेळ्या मेंढ्या जास्त तो गावचा सावकार माणूस.

सखाराम कडे ७०० मेंढ्या, ३००शेळ्या आणि २०० कोंबड्या होत्या.

👉सर्वात जास्त जीतराप असल्याने तो गावचा सावकार पण होता.पण गेल्या५-६ वर्षात बादशाही आक्रमणे महाराजांच्या मुळे बंद झाली,पण टकमक वरुन खाली येणारी मढी हे नवे दुखणे रायगड परिसराला जडले होते.

👉 वर स्वर्गात डोके खुपसून महाराष्ट्राला सुखी करणारा रायगड,खाली मात्र नरक यातना देत असे.

👉कित्येक वेळा अनेकांनी रायगड वर जाऊन ही बातमी सांगितली होती,पण दखल घ्यायलाच कोणी नव्हता, म्हणून सखाराम हे गाऱ्हाणे घेऊन खुद्द महाराजांना भेटायला निघाला होता. त्याचे कारण पण गंभीर होते…!

“पावसाळा नुकताच संपला होता,सारा रायगड परिसर हिरवागार शालू नेसून नटल्यासारखा झाला होता. जनावरांना खायला प्यायला वैरण पाणी मोप मिळत होते. सखाराम चा बाळ्या सकाळी उठून टकमकाच्या खाली शेळ्या घेऊन जायला निघाला होता.

सखाराम ने त्याच्या सोबतीला घरचा नोकर पांडू ला पाठवून दिले..! परवाच्या मध्यरात्रीला टकमकाच्या बाजूने एका माणसाच्या जिवाच्या आकांताने किंचळण्याच्या आवाजाने सारा वाडा जागा झाला होता.

👉 अजून एक मराठेशाहीचा फितूर,गद्दार बहुतेक टकमकवरून खाली आला असणार हा अंदाज सर्वांनी बांधला होता,

♨️सकाळी जाऊन सखाराम पाहून आला होता,पण ते मढ कुठं नजरेस पडलं नव्हतं.

त्या दिवशी बाळ्या शेळ्या हिंडवायला गेला होता,माघारी येता येता संध्याकाळ होत आली आणि दाट जंगलात भुकेने व्याकुळ दोन बिबळ्या वाघ ते परवाच मढ तोडून खात होते,हे दुरुनच पाहून बाळ्याला घेऊन पांडू वाड्याकडे धावत सुटला,तितक्यात एका फांदीला पाय अडकून पांडू खाली पडला आणि मावळतीच्या बाजूला एक काळाकिभिन्न मनुष्य हातात मजबूत काठी घेऊन,गळ्यात चांदीची पेटी घालून पांडू आणि बाळ्या कडे पाहून हसत उभा होता…!

पांडू आणि बाळ्या धडपडत उठले. शेळ्या,मेंढ्या तिथेच सोडून जीवाच्या आकांताने धावू लागले.धापा टाकत ते वाड्यात पोहोचले आणि जोरजोरात सखाराम कारभाऱ्याला हाक मारू लागले . त्यांचा आरडाओरडा ऐकून सारे गाव एकत्र जमा झाले.घडलेली हकीकत त्यांनी सखाराम ला सांगितली. सखाराम आणि गावकार्यांनी आता हि गोष्ट रायगडावर जातीने सांगून याचा बंदोबस्त केला पाहिजे असे मनोमन योजले होते.

सर्व गावकर्यांच्या मनात भीतीने काहूर माजले होते.काहीही करून या जनावरांचा बंदोबस्त झालाच पाहिजे असे सर्वाना वाटले.

रात्री झोपताना बाळ्या अंबिका आईला घडलेली सर्व कहाणी सांगू लागला,आणि सांगता सांगता त्याला एकदम आठवले कि आपण जिथे फांदीत पाय अडकून पडलो होतो तिथे एक काळाकभिन्न माणूस आपल्याकडे पाहत उभा होता.

त्याने हि हकीकत सखाराम ला सांगितली.
निर्मनुष्य टकमक दरीच्या खाली,आपल्या वाड्यावरच्या मेंढपाळ गड्याव्यतिरिक्त दुसरा मनुष्य कसा येऊ शकतो याचे सर्वाना नवल वाटले.

असेल कोण तरी गुराखी,जो वाट चुकून तिथे आला असावा असे म्हणत सखाराम ने विषय टाळला आणि सकाळीच रायगड च्या वाटेला निघायचे असे ठरवून सोबत कोणाकोणाला न्यायचे हे जाहीर करत सर्वाना तयारीचे आदेश दिले.

वाड्यावरचे सखाराम चे लहानपणाचे मैतर मल्हारी,सर्जा आणि नारायण याना घेऊन जायचे नक्की केले.


तिघेही अंगाने मजबूत आणि एका विचाराचे होते.सखाराम वर त्यांचा फार जीव होता.सर तयारी झाली आणि ती रात्र भूतकाळात जमा झाली.

सकाळच्या पहिल्या प्रहरी कोंबड्याने पहिली बांग दिली.
सखाराम च्या दोन्ही कारभारनी लौकर उठून स्वयंपाकाला लागल्या.
पहाटेच्या धुक्यात रायगड खूपच सुंदर दिसत होता.टकमकापासून वरचा सारा भाग धुक्यात झाकून गेला होता.

दुरून पहिले कि एखादा पैलवान कानाला पांढरी कानटोपी घालून बसल्या बसल्या गुडघ्यात मान खुपसून डुलकी मारत आहे असा भास होत होता.

राधिका आईने कोंबड्याची डालगी (खुराडी) चे झाकण काढले आणि आत विसाव्या घेणाऱ्या कोंबड्या बाहेर पडल्या..आणि मग त्या कोंबड्यांचे आवाज ऐकून गावातील इतर घरातील खुरुडे जोरात ओरडू लागली.
सखराम ने भरडलेल्या नाचणीच्या पोत्यातून काही नाचणी काढून अंगणात टाकली तशी कोंबड्यांचे थवे त्यावर तुटून पडले.

लहान लहान कोंबड्या तर सखाराम च्या खांद्यावर,डोक्यावर बसल्या.सखाराम ने त्या बाजूला करत अजून काही नाचणी टाकली.

समोरच्या शेळ्यांच्या कुंपणात शेळ्या,मेंढ्या सुध्दा आशेने त्याच्याकडे बघत होत्या.

समोर असलेली गवताची गंजी सोडून त्यांच्याही चारा पाण्याची सोय केली.
गोठ्यातला गाई,म्हैशी,बैल सर्वाना चारा टाकला.
एव्हाना तांबड फुटायला लागले होते.
सोबत येणारे मैतर अंगावर घोंगड,खायला भाकर्या बांधलेली झोळी आणि कुर्हाड घेऊन सखाराम च्या दारात हजर झाली.

सखाराम ने न्याहारी आटपली आणि कपाळाला भंडारा लावत त्या साथीदारांच्या कपाळी सुधा भंडारा लावला आणि राधिका,अंबिका ला सांगून जायला निघाले.नारळाच्या काथ्यापासून बनवलेले जाड गोणपाट निमुळते करत पावसापासून वाचण्यासाठी त्याचे गोंचे करून चौघांनी डोक्यावर घेतले होते.

एव्हाना बारीक रिमझिम पाउस सुरूच होता.
सोबत असावा म्हणून एक घोडा चौघात घेतला आणि त्यावर आणलेले जेवणाची थैली बांधत सखाराम ने एकवार टकमक टोकाकडे पाहिले.

सखाराम ला आठवले कि शेवटच्या वेळी ‘शिवाजीराजे भोसल्यांच्या’ राज्याभिषेकाला रायगडावर जाऊन खुद्द महाराज पहिले होते.सरसर भूतकाळ त्याच्या नजरेपुढे येऊ लागला.
आजवर ज्याच नुस्त नावच ऐकून लहानाचा मोठा झालो तो शिवाजी त्या दिवशी राजा झाला होता.

👉जावळीच्या मोरे आणि पुण्याच्या भोसल्यांच्या दंग्यात रायरी परिसर एककाळी हादरून गेला होता.

महाबळेश्वर पासून ते महाड पर्यंतचा पूर्ण दाट जंगल जाळीचा पट्टा जावळीकर मोऱ्यांच्या ताब्यात होता.

काय घडले देव जाणे पण एके दिवशी भगवे झेंडे घेतलेले हजारो हशम रायगडला भिडले आणि तेव्हापासून ते आजवर कधीही रायगड परिसराला अवकळा लागली नव्हती.सर्व काही आनंदात होते.

शिवाजी महाराजांनी पाण्यासारखा पैसा ओतून हा रायरीचा किल्लारायगड’ केला होता.


त्यावेळी आमच्या वाड्यानेच जंगलातल्या वाटा,चोरवाटा महाराजांच्या फौजेला दाखवून दिल्या होत्या.
आणि एक दिवस महाराज राजे झाले होते.


मुठीत मावेल तितके सोन महाराज सर्व रयतेला वाटत होते..एक नाहीतर दोन क्षण त्या महाराष्ट्राच्या महादेवाचे दर्शन झाले होते..!

टकमकाकडे पाहत सखाराम हे सारे आठवत होता.
सर्वजन जायला निघाले.

👉वाड्यापासून टकमकाच्या खालूनच रायगडाच्या ‘चीत’ दरवाज्याकडे जायला वाट होती.

वाटेत महाराजांचे मोर्चे,मेटे होतेच,पण ह्या असल्या मुसळधार पावसात तिथ कोण असेल का नाही सांगता येणार नाही.
मल्हारी,सर्जा,नारायण आणि सखाराम हे चौघे त्या वाड्यातून चालू लागले.

वर रिमझिम पाउस होता ,पण गोंच्यामुळे डोक्याला न लागला बारीक तुषार तोंडावर पडत होते.
जेवण भिजू नये म्हणून त्यावर घोंगडे टाकले होते.
मल्हारी ने घोड्याचा लगाम पकडला होता आणि हे चौघे चिखल तुडवत टकमक दरीकडे चालत जात होते.
साधारण दोन प्रहर चालून झाले.सूर्य चांगलाच वर आला होता.

१-२ कोसावर टकमक दरी येईल असा अंदाज लागला आणि चौघांच्याही अंगावर शहरा आला.
एक प्रकारची अनामिक भीती होती मनात.
आजवर इतकी माणसे वरून खाली आली ,काय झाले असावे त्यांचे ?

माणूस मेल्यावर नक्की जातो कुठे …आणि इतक्या वरून पडल्यावर किती बेकार जीव जात असल एकेकाचा..!
चोघांच्याही डोक्यात अनामिक भीती होतीच….आणि तितक्यात टकमकावरून आणखी एक आकाशपाताळ भेदणारी जीवघेणी किंचाळी ऐकू आली..!

चौघेही सावध होऊन वर पाहू लागले तर त्याना दिसले कि टकमकावरून आज आणखी कोणाला तरी कडेलोट झाली आहे..!

भीतीने सर्वांग थरारून उठले होते….कमी आवाज…हळूहळू मोठा झाला आणि अवघ्या काही अंतरावर धड्ड असा आवाज करत जंगलाच्या दाट जाळीत ते मढ पडलं आहे याचा चौघानाही अंदाज आला…..चौघेही एकमेकाकडे पाहू लागली.
खूप विचार करून उसन्या आवसानान सखाराम बोलला…..गड्यानो…आपण ते कोण आहे बघून येउया का र…?

क्रमशः बहिर्जी नाईक यांची कहाणी बाजींद भाग १

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

यांची कहाणी


बाजींद भाग २

बाजींद भाग २ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग २ – मल्हारी,सर्जा आणि नारायण प्रश्नार्थक मुद्रेने सखाराम कडे पाहू लागली. सारा गाव ज्या गोष्टीमुळे गेली ५-६ वर्षे भीतीच्या दडपणाखाली आहे,त्या गोष्टीजवळ येऊन हा माणूस त्या गोष्टीला जवळून पाहूया कसा काय म्हणत असेल हा प्रश्न तिघांना पडला होता.

सखाराम ने तिघांच्याकडे पाहत उचश्वास टाकत बोलला..!

अरे आजवर घर-संसार पाहतच आलोय आपण,देवाच्या दयेने आसपास च्या बारा वाड्यात चांगलं नाव हाय आपलं.
ही असली मेलेली मढी किती दिस भ्या घालणार आपणाला.

हे बगा, खंडोबाचा भंडारा लावलाय आपण भाळाला, जरा धीर धरुन ती मढ बघुया,म्हणजे वर गडावर गेल्यावर बोलायला तोंड मिळलं आपणाला,राजा देवमाणूस हाय आपला,आपल संकष्ट नक्की त्यांच्या ध्यानी येईल…चला,खंडेरायाच नाव घ्या आणि या माझ्या मागं…!


सखाराम च्या असल्या बोलण्याने तिघांनीही धारिष्ट्य केले आणि मान हालवून टकमक दरीकडे पाय वळवले.

एव्हाना रिमझिम पाऊस थांबला होता,आणि कोवळे उन्ह अंगावर पडू लागले होते.
घोड्याला पण उन्हामुळे चांगली उब मिळत होती,तो पण मनोमन सुखावला होता.
रायगड ची उंची स्वर्गाला भिडली होती.
वर पडलेला पाण्याचा थेंब न थेंब सरळ खाली येत होता.
त्यामुळे वरुन धबधबणारे पाणी ओढ्यात मिळून छोटे छोटे नाले तुडुंब भरुन वाहत होते.
पायात कातडी पायतान पाण्याने आणि चिखलाने जास्तच जड झाल्याने चौघांनी ते काढून मधोमध कासरा बांधून घोड्याच्या पाठीवर बांधले आणि एका मोठ्या चिंचेच्या झाडाला घोडा बांधून,कुऱ्हाडी आणि घोंगडे अंगावर घेऊन ते ओढ्यातून वाट काढत टकमक दरीकडे निघाले.

चौघेजण ओढ्यातून पुढे पुढे जाऊ लागले,चांगले मध्यावर गेले आणि चिंचेला बांधलेला घोडा दोन्ही पाय वर करत जोरजोराने किंचाळू लागला..!
काय होतय चौघांना कळेना,आसपास पहिले तर गार वाऱ्याशिवाय चिटपाखरु पण नव्हतं..मग ह्येला काय झाले ओरडायला समजेना…!

त्याने हिसका मारुन लगाम,दावे तोडले आणि सुसाट वेगाने बाजूच्या जंगलात पळून गेला..!

घोड्याच्या या विलक्षण वागण्याने नारायण मात्र पुरता घाबरला,तो म्हणाला …”गड्यानो, मला काय लक्षण ठीक दिसणा…माझा घोडा आजवर असा कवाच वागला नाय…माझं ऐका,मागं फिरुया..चार दोन दिसान पाचाड ला सांगावं धाडून सगळी हकीकत महाराजांच्या खासगीत सांगूया…पण आत्ता बाहेर पडूया…!

सखाराम त्यावर रागात बोलला…”महाराजांची खासगी तुझ्यासारख्याच ऐकून घ्यायलाच बसली हाय जणू…सारा महाराष्ट्र सांभाळायचा हाय त्यास्नी…तुझ्या घोड्यान साप-पान बघितलं असलं म्हणून तो गेला पळून… दरीकड जाऊन लौकर मागं येऊन त्याला शोधूया…चला पाय उचला लौकर…!

सारे जण त्या भयाण ओढ्यातून पुन्हा चालू लागली.
चांगलं छातीपर्यंत पाणी आलं आणि पाण्याचा जोर जाणवू लागला.
चौघांनी एकमेमेकांना हात देऊन कड केलं..!
ओढ्याच्या बरोब्बर मध्यावर आलं तस वाघांच्या एका गगनभेदी किंचाळीने पावसाने गारठून अंग चोरून बसलेली चिमणी पाखर आभाळात उडू लागली आणि चौघांच्या अंगावर भीतीने शहारे आले….ओढ्याच्या पाण्याच्या वेगाने ते एकसारखे वाहू लागले आणि चौघांची हाताची कडी तुटली आणि ते उत्तरेकडे वाहू लागली…!
जो तो आता जीव वाचवायचा प्रयत्न करु लागला..!

👉मल्हारी पूर्वी महाड ला सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या तालमीत 3-4 वर्षे राहून आलेला गडी होत.


👉सिंहगड लढाईत सुभेदार गेलं आणि तालमीतल्या पैल्वाणांच्या वर उपासमारी आली..म्हणून चौघांनी पण कुस्तीला रामराम ठोकून गाव गाठला होता.


पण त्या कुस्ती मुळे पुरात पोहायचे कसे त्यांला चांगलेच ठाऊक होते,त्याने सर्वाना ओरडून सांगितले की काठावर असलेल्या वडाकडे बघत पोहा….!

पुरात जर फसला तर हात पाय हलवून काय उपयोग नसतो..अश्यावेळी एक करायचं की काठावर असलेलं कोणतही मोठं झाड त्याकडे लक्ष देत तिरकस पोहत पोहत जायचं…पाण्यात साप,विंचू,काटे काहीही येवो लक्ष द्यायचे नसते…चौघेही पुराची धार तोडून एका महाकाय वडाच्या झाडाजवळ पोहोचले…!

चिंब भिजलेल्या चौघांच्या कुऱ्हाडी पाण्यात वाहून गेल्या होत्या.
घश्यात पाणी गेले होते त्यामुळे चौघेही ठसके देत देत काठावर दम खात पहुडले होते…!

साधारण दम कमी कमी झाला आणि सखाराम क्षणात सावध झाला आणि मल्हारी,नारायण,सर्जा कुठे आहेत पाहू लागला..!
हाकेच्या अंतरावर तिघेही दम खात पहुडले होते.
सावकाश पावले टाकत तो तिघांच्या जवळ जाऊन तिघांना सावध केलं..!

नारायण,दम खात बोलला…तुम्हाला म्या सांगत हुतो,आरं जनावरं ते बघू शकट्यात जे तुम्हाला आमाला दिसत नसतया… खण्डेरायचा आशीर्वाद म्हणून वाचलो,पण आता हिकडं वाघाची डरकाळी ऐकली नव्ह…आता काय करायचं…?

सखाराम ने धीर देत त्याला सांगितले,अरे नको काळजी करु.. या सगळ्या भाकडकथा आहेत.


तस जर नसत तर ३५० वर्षे महाराष्ट्र गुलामगिरीत राहिलाच नसता…देव देवरस पण काय कमी होत काय आपल्याकडं….पण शिवाजीराजानं तलवारीच्या जोरावर संपवलीच ना गुलामगिरी…पण विचारांची गुलामगिरी कवा संपणार आपली देव जाणे…

चला धीर धरा…वाड्या जवळची हजारो घरटी आपल्या चौघांच्या नजरेला नजर लावून बसली असतील…या असल्या फालतू गोष्टीत भिऊन बसला तर शेण घालतील लोकं आपल्या तोंडात..उठा बिगीन आणि चला…!

सखाराम च्या निर्वाणीचा बोलणे तिघांनाही ऊर्जा मिळाली,चौघेजण पुढे चालू लागले…!

तो महाकाय वडाचा बुंधा पाहून कोणीही भयकंपित होईल.
त्याच्या त्या विशाल पारंब्या पाहून जणू ब्रम्हराक्षस वाटेत ठाण मांडून बसला असावा असा भास होत होता.

चौघे जण वर टकमक टोकाकडे पाहत दरी कुठे असेल अंदाज बांधत त्या वडाला बगल देऊन चालू लागले..!

ओढ्याच्या काठापासून जंगली भाग फारसा दूर नव्हता,म्हणायला म्हणून ते पठार होते,पण सारी जंगली झाडे फार.
एव्हाना सूर्य माथ्यावर आला होता,पण पावसाळी ढगाने इतकी गर्दी केली होती की संध्याकाळ झाल्याचा भास होत होता..!

तिघेही जंगलात घुसणार इतक्यात वाघांची ती प्रचंड डरकाळी समोरच्या झाडा झुडपातून येऊ लागली..!
चौघांची सर्वांगें थरारली.
जंगलातील झुडपे हालवत ती श्वापदे बाहेर पडत होती.
किती होती काय माहित,नक्कीच एक पेक्षा जास्त होती हे नक्की.
आता मात्र सखाराम च्या धीराच्या गोष्टी ऐकण्यात नारायण,सर्जा,मल्हारी तिघांनाही रस नव्हता…आणि त्या गोष्टी सांगायला सखाराम कडेही वेळ नव्हता…आल्या पावली ते वडाच्या झाडाकडे धावू लागली…!

डरकाळी चा आवाज मोठा होत गेला आणि सखाराम चा पाय फांदीत अडकून सखाराम पडला…नारायण ने ते पहिले आणि सर्जा व मल्हारी ला थांबवत त्याला उचलायला गेली तितक्यात ते पावसाने भिजलेले वाघाचे प्रचंड धूड जंगलाबाहेर पडले…त्यापाठोपाठ अजून एक..अजून एक…चौघांची डोळे विस्फारली गेली आणि हात पाय गाळून चौघे बसल्या जागी भीतीने गारठून ओरडू लागली…

किमान ५-६ धिप्पाड वाघ छलांग मारत मारत चौघांचा वेध घेत येत होती…चौघांनी जगण्याचा धीर सोडला आणि डोळे मिटून त्यांचा इष्ट देव खंडेरायचा धावा सुरु केला…..वाघ चवताळत आले…बस्स आता एकच झेप आणि खेळ संपला…तितक्यात…….

सुं.. सुं… सुं…. करत एकापाठोपाठ एक बाण वडाच्या झाडापाठीमागून कोणीतरी सोडले….वाघांचा तो वादळी आवेग आणि वाऱ्यासारखा वेग क्षणात कमी झाला…ते बाण बरोबर सखाराम आणि त्या तिघांच्या पुढे काही अंतरावर जमिनीत घुसले…ज्याने ते बाण सोडले त्याकडे भयभीत नजरेने ते 5-6 वाघांचे प्रचंड धूड पाहत..आल्या पावली वाऱ्याच्या वेगाने पुन्हा जंगलात पळून गेली…!

चौघांनी डोळे उघडून ते पळून जाणारे वाघ पाहिले आणि आश्चर्यकारक नजरेने उभे राहिले व समोर घुसलेल्या बाणाकडे पाहत एकदम मागे फिरले…!

क्रमशः बाजींद भाग २

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

यांची कहाणी


बाजींद भाग ३ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

बाजींद भाग ३ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग ३ – आभाळातून वीज चमकावी तसे ते दोन बाण वाऱ्याच्या वेगाने येऊन समोर जमिनीत घुसले अन जिवाच्या आकांताने ते वाघांचे धूड पळताना पाहून सखाराम व मित्रांना आश्चर्य वाटले.

एव्हाना जिवाच्या भीतीने पळत सुटलेले ते चौघेही जणू काही झालेच नाही अश्या आवेशात उठली आणि आपल्या बचावासाठी एवढया पावसात आणि या दुर्गम जंगलजाळीत कोण आला आहे याचा कानोसा घेऊ लागली.

तो कोणीही असो,त्यांच्यासाठी देवदूत होता.


एक दीर्घ श्वास घेत ते चौघे वडाच्या झाडाकडे पाहू लागले…आणि त्यांना हातात धनुष्य घेतलेल्या एका योध्याचे दर्शन घडले…!


सहा साडेसहा फूट उंच,अनवाणी पण भव्य पाय,दोन्ही पायात काळा दोरा,अंगात धोतर आणि काळा अंगरखा ज्यावर रक्ताचे डाग…गळ्यात चांदीची पेटी लटकत होती.
कमरेला समशेर व पाठीला ढाल होती.

कमरेला पांढरा शेला बांधला होता,डोक्याला मराठी पद्धतीचे मुंडासे व भव्य कपाळावर भंडारा लावला होता..आग ओकणारे लाल भडक डोळे,सरळ सळसळीत नाक,कल्लेदार मिशा….एक विशी पंचविशीत तो तरुण धिप्पाड मल्ल भासत होता…!

चेहऱ्यावर एक प्रकारची गंभीरता स्पष्ट जाणवत आपले भव्य अनवाणी पाय त्या ओढ्याच्या भिजलेल्या मातीवर ताकत तो एक एक पाऊल त्या चौघांच्याकडे येत होता.

चौघांनाही कुतूहल,आश्चर्य,अनेक प्रश्न पडले होते…कोण असावा हा धीरगंभीर पुरुष…!

चौघांनीही धीर एकवटून त्या पुरुषांकडे जायला पावले उचलली आणि तितक्यात आभाळातून सरसर मेघधारा बरसू लागल्या..!

तो धिप्पाड पुरुष तसाच मागे सरकला आणि वडाच्या डोलीत थांबत त्या तिघांनी तिथे येण्यासाठी खुणावले..!

ती खून मिळताच तिघेही धावत त्या डोलीकडे धावू लागली…धावताक्षणी एवढ्या मुसळधार पावसातही वाघांच्या डरकाळ्या मात्र पुन्हा एकदा ऐकू येत होत्या….!

चोघेही त्या युवकाजवळ आले,निशब्द शांतता भंग करत सखाराम त्याला बोलला…!

“पाव्हणं… कुण्या गावचं तुमी ?


लय उपकार झाले बगा तुमचे,माझ्या खंडेरायानेच तुम्हाला हित पाठवलं बगा..तुमचे लय उपकार झाले”
सखाराम च्या शब्दाला मान डोलवत तिघेही सुरात सुर मिसळून मान हलवू लागली..!

क्षणभर शांतता पसरली,अन काही क्षणात त्या युवकाचा धीरगंभीर आवाज ऐकायला मिळाला…

”कोण तुम्ही ? का आला आहात तुम्ही इकडे ?”

निर्धारी प्रश्न विचारत त्याचे ते अंगार ओकणारे डोळे त्या चौघांवर पडले अन चौघांनाही काय बोलावे क्षणभर समजेना…!

आम्ही धनगरवाड्याचे,रायगड ला निघालो आहोत…सखाराम बोलून गेला…!

रायगडी ? कशासाठी ?
क्षणाचाही विलंब करता त्या युवकाने प्रतिप्रश्न केला…!

मग,सखाराम ने त्यांच्या येण्याचे कारण सांगितले.
टकमकावरुन येणाऱ्या मढ्यांच्या मास रक्ताला चाटवलेले वाघ,जनावरे माणसावर हल्ले करत आहेत..सारे पंचक्रोशीतील गाववाले हैराण आहेत या गोष्टीवर…म्हणून आम्ही हे प्रकरण रायगड च्या सरकारी लोकांच्या कानावर आणि गरज पडली तर महाराजांना भेटून सांगायचे म्हणून घराबाहेर पडलो आहोत…!

मूर्ख आहात तुम्ही…मोठ्या आवाजात तो युवक बोलला…

तुमची गाऱ्हाणे ऐकायला असे कसेही भेटतील काय सरकारी अधिकारी आणि महाराज ?

आणि रायगड सोडून या दरीत का आलाय मरण्यासाठी ?

त्याच्या या प्रश्नाने नारायण बोलला…आर कोण र तू ?

मगापासून ऐकून घेतोय तुझं..वाघापासून वाचवलं म्हणून तुझं उपकार मानायला लागलो तर आम्हाला कायदा शिकवायला लागलास काय ?आधी तू सांग कोण आहेस, आणि हे अंगावर रगात कसलं ?

नारायण च्या या बोलण्याने तो युवक थोडा आकसला….!
मोठा श्वास घेऊन बोलला…मी …मी कोण ?
हाच प्रश्न जन्मापासून स्वतःला विचारत लहानाचा मोठा झालोय….!

अजून उत्तर सापडत नाही,आणि आता सापडून पण उपयोग नाही..!

खंडोजी नाव माझं..!


महाराजांच्या हेर खात्यात बहिर्जी नाईकांच्या समवेत 10 वर्ष काम केलंय…
पण…पण आता भटकतोय या दरीत एकटाच..!
वाट बघतोय कोणाची तरी…!

खंडोजी च्या या बोलण्याने चौघेही आश्चर्यचकित झाले..!
चौघांना चूक झाल्याची जाणीव झाली आणि सखाराम ने खंडोजी ला माफी मागत बोलू लागला….

“माफ करा सरकार,आम्ही गरीब लोक,ह्यो नारायण,ह्यो मल्हारी,ह्यो सर्जा आणि आन म्या सखाराम”

मल्हारी पण महाराजांच्या फौजेत जायला गेला हुता सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या तालमीत,पण हत्यारे शिकत व्हता आणि सिंहगड च्या दंग्यात सुभेदार गेलं आण मग ह्यो परत आला गावाकडं…आमची लय इच्छा व्हती की राजांच्या फौजेत सामील व्हावं पण एवढं नशीब कुठलं ओ आमचं…पण खंडेरायाच्या कृपेनं गावगाडा सांभाळतो आमी.. 

गावसाठीच सरकार ला हे टकमक वरची मढी काढायला कोणाची तरी नेमणूक करा म्हणून आर्जव करायला निघालोय आम्ही…

तुम्ही नाईकांच्या जवळचे म्हणजे महाराजांचे पण जवळचेच… आम्ही हात जोडतो एवढं पुण्य घ्या पदरात….आमची गाऱ्हाणी सांगा सरकारी दरबारी…”

चौघांनी खन्डोजी ला हात जोडलेलं बघितलं आणि खन्डोजीने हातातलं बाण खाली टाकत सखाराम चा हात पकडत म्हणाला….नका हात जोडून अजून पापात पाडू मला….आधीच लय पापाचे ओझं घेऊन वावरतोय मी….चला मी तुम्हाला मदत करतो…”

खंडोजी च्या आश्वासनाने चौघांना धीर आला.

खंडोजी म्हणाला…पण गड्यानो..मी फक्त तुम्हाला मार्ग दावीण आणि युक्त्या सांगीन…मी स्वता काय बी करणार नाही…मला कोणीही प्रश्न विचारायचा नाही..मी सांगल तस जर वागायचं वचन देत असशील तर मी नक्कीच या कामात तुम्हाला मदत करीन..”

चौघांनीही होकारात्मक मान हलवली.
खंडोजी ने वडाच्या डोलीत ठेवलेली एक कानाबरोबर उंचीची काठी काढली आणि चौघांकडे पाहत बोलला….चला निघूया, आता जोवर तुमच काम होत नाही तोवर माघे यायचे नाही…”

सखाराम,नारायण,सर्जा,मल्हारी चौघांनाही खंडोजी च्या रुपाने आशेचा किरण दिसू लागला.

ते चौघे खंडोजी च्या पाठोपाठ पावले टाकत त्या जंगलात निघाली..!
एव्हाना पाऊस बंद झाला होता,सूर्य मावळतीला झुकत निघाला होता.
“मंडळी,रात्र होण्याच्या आधी इथून तीन कोसावर एक चोरवाट आहे दाट जंगलात,पण गेल्या 15-20 वर्षात तिकडं कोणी फिरकला नसेल.


आपल्याला रात्र काढायला चांगलं ठिकाण आहे,आजची रात्र तिथं काढूया आणि सकाळी दिवस उगवायला रायगड च्या हमरसत्याला लागूया…!


मोर्चे,मेटे आडवे आहेत,पण तिकडं गेला तर परवाने,ओळख सगळं विचारतील आणि विनाकारण तुरुंगात पण डांबून ठेवतील जर ओळख नाही पटली तर…!


मला ह्यो परिसर घरच्या वाणी आहे,मी तुम्हास्नी निम्म्या वक्तात चित दरवाजा जवळ नेतो…आणि मग पुढ काय करायचं मी संगतोच…चला लौकर पाय उचला…!

खंडोजी तरातरा चालू लागला.पायात पायतान नसताना त्याचा चालायचा वेग बघून चौघेही पाहातच राहिले,त्यांना पायात पायतान असून चालन जमत नव्हतं एवढया वेगाने…!

आणि केवळ अर्ध्या एक तासात एका दाट अरण्यात त्यांचा प्रवेश झाला.इतके दाट की झाडाला झाड लागून असावे इतकी झाडांची गर्दी…!


जमिनीवर लाकडे कुजून काळा थर चढला होता,त्यावरून खंडोजी च्या मागे ते निघाले होते.


त्या भयप्रद जंगलाला बघून मल्हारी बोलला…सखा,लगा हयात गेली मेंढर चरवण्यात इकडं कधी येन झालं नाही,कितीतरी येळा जवळन गेलोय मी,इतकी दाट झाली आईच्यान सांगतो बघितली नव्हती,ही झाडी कशी काय आली असलं इथं ?


गप र…भिऊन काय बी बरळु नको,महाराजांचा हेर आहे खंडोजी, असलं त्याला गुप्तवाट माहिती..चला गुमान..”

जंगलाच्या मध्यावर येताच जंगली किड्यांची किरकिर आवाज अतिशय वाढला,सूर्य मावळातील गेल्याने पुढचं काय दिसत नव्हतं..!


एका पाऊलवाटेने ते चालत होते आणि एका वळणावर खंडोजी बाजूला गेला आणि सखाराम पुढे आला तर खंडोजी कुठे नजरेस पडेना..!
त्याने मागे पाहिले आणि सर्जा,नारायण,मल्हारी ला सांगितले की खन्डोजी कुठे गेला ?


एव्हाना पूर्ण रात्र झाली होती,ते चालत चालत जंगलाच्या मध्यावर एका पडक्या मंदिराजवळ पोहचली.
या इतक्या दाट जंगलात हे मन्दिर कुठले असावे हा प्रश्न चौघांना पडला..!


पावसाने मंदिराच्या शिखरापर्यंत हिरवे शेवाळ दाटले होते,समोर दगडी नंदी सुद्धा पावसाने भिजून त्यावर सुद्धा शेवाळाची हिरवी झालर चढली होती..!

सखाराम म्हणाला…अरे ह्यो खन्डोजी कसा आणि कूट गेला ?
आता र काय करायचं ?


एक काम करुया आजची रात्र या मन्दिराचा आसरा घेऊया आन उद्या आपण आपलं हमरस्ता हुडकून आपल्या मार्गानं जाऊया…!
तिघांना हे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता…!

ते चौघे आत शिरले.
ते प्राचीन दगडी मन्दिर महादेवाचे होते.


कित्येक वर्षे हे दुर्लक्षित असावे असे वाटले,पावसाने पाणी आत थेंब थेंब झिरपत होते..!

नारायण बोलला, चला माझ्या महादेवाच्या गाभाऱ्यात तर आसरा मिळणार.. म्हणत ते मंदिरात घुसणार इतक्यात शेकडो वटवाघळे एकाच वेळी मंदिराच्या बाहेर पडली.


चौघांनी डोळे बंद करून डोळ्यासमोर हात ठेवत मागे पाय घेतले पण तितक्यात सर्व वटवाघळे उडून गेली….!


त्यामन्दिरात चौघे जाऊ लागले..पूर्ण अंधारात असलेल्या त्यामन्दिरात थोड्याच अंतरावर आत निरंजनाचा प्रकाश दिसला…!


चौघांनी डोळे विस्फारले…अंगावर काटे आले आणि भीतीने गागारुन गेले …अरे इतक्या पडक्या मंदिरात निरंजन लावायला कोण आले .असा प्रश्न पडून ते धावत मागे पळणार इतक्यात बाहेर धो धो पाऊस सुरु झाला होता….आता मंदिराच्या आत प्रवेश करुन काय प्रकार आहे हे पाहिल्याशिवाय पर्याय नव्हता….!


धीर धरुन ते आत आत सरकू लागले…धूप ,अत्तराचा सुगंध आणि निरंजनांच्या सोनेरी प्रकाशात महादेवाचे शिवलिंग झळाळत होते आणि उजव्या अंगाला एक जातीवन्त कुळवंत स्त्री फुलांची माळ करण्यात व्यस्त होती…..!


चौघांची भिवये वर झाली…पडके मन्दिर,वटवाघळे आणि आत इतकी सुंदर आरास करणारी हि बाई कोण ?
मल्हारी ची बोबडी वळण्याचा मार्गावर होती,त्याने सखाराम चा हात घट्ट पकडला…..!

क्षण दोन क्षण…त्या स्त्री चे लक्ष दरवाज्या कडे गेले आणि तिने खुंटी ला अडकवून ठेवलेली तलवार उपसून अंधारात लपलेल्या त्या चौघांच्यावर तलवार रोखत लढाईचा पवित्रा घेत बोलली….कोण आहे दरवाज्यात…सरळ पुढं या नाहीतर खांडोळी करीन…..!

क्रमशः बाजींद भाग ३ | बहिर्जी नाईक यांची कहाणी | बाजींद भाग ३

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

यांची कहाणी


बाजींद भाग ४ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

बाजींद भाग ४ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग ४ – आभाळातून वीज चमकावी तशी त्या स्त्री च्या एकाकी आव्हानाने सखाराम व त्याचे मित्र पुरते गांगारुन गेले.

धीर धरुन सखाराम एक पाऊल पुढे आला व बोलू लागला….

“आमी धनगरवाडी चे गावकारभारी हा ओत, रायगडावर निघालोय, पावसाचा जोर वाढला म्हणून निवारऱ्याला हिकडं आलो…”


“खोटं नगा बोलू.. नायतर एकेकांची खांडोळी करीन… इकडं कोणीही फिरकू शकत नाही, बिकट चोरवाट फक्त हेरांना ठाऊक आहे याची…”
ती स्त्री बोलली…!

नारायण बोलला…
महादेवाची आण घेऊन सांगतो, आम्ही स्वताहून हिकडं नाय आलो…त्यो खंडोजी म्हणून एकजण भेटला, महाराजांचा हेर आहे म्हणून सांगत होता…”

काय ..?
खंडोजी …कुठं भेटला तो तुम्हाला ?
स्त्री उदगारली….!

मग, घडलेली सारी हकीकत व ज्या कारणाने ते चौघे रायगड वर निघालेत ते त्यांनी त्या स्त्रीला सांगितले.

चौघांची कथा ऐकून त्या स्त्री ने तलवार खाली केली आणि चौघांना आत या म्हणून खुणावले…!

चौघेही आत आली…जवळच एका मडक्यात पाणी होते, ते घेऊन त्या स्त्री ने चौघांना दिले..!

सारे जण पाणी पिऊ लागले, आणि मल्हारी ने जड शब्दात त्या स्त्री ला प्रश्न केला….
ताई, एवढया भयंकार जंगलात, या पडक्या देवळात, या असल्या जीवघेण्या पावसात तुम्ही एकल्या कशा ?
कोण हाय तुम्ही?

किंचित स्मितहास्य करत ती बोलू लागली…..
मला साऊ म्हणतात…..

महाड चे सरदार शिर्के यांची मी मुलगी…!


आमचे वडील आदिलशाही चे सरदार.


शिवाजीराजांनी रायगड जिंकला आणि आसपास चे सारे आदिलशाहीचे सरदार त्यांना मिळाले, फक्त आमचे वडील सोडून…पण…शेवटी त्यांनी पण महाराजांना साथ द्यायचे ठरवले…हम्म.. खूप मोठी कथा आहे दादा…वेळ आली की सांगीन…!

पण, खंडोजी तुम्हाला कुठं भेटला…?
आणि, तो कसा आला नाही इकडे…त्यालाच तर शोधायला मी इथवर आली आहे…!

काय ?
त्याला शोधायला…सर्जा बोलला..!


अहो, तो आम्हाला चोरवाट दाखवतो म्हणून हिकडं घेऊन आला आणि स्वता गायब झाला…कुठं आणि कसा गेला काय माहिती…आमाला फकस्त या रात्री हित आसरा द्या…सकाळी येरवाळी आमी आल्या पावली निघून जाऊ…”

का ?


साऊ बोलली…अहो, आजवर कोणालाच आम्हाला मदत करता आली नाय, खंडोजी आणि आम्ही सारे या जंगलात खूप दिवसापासून दबा धरून आहोत… तुमची मदत करायला आम्हाला आवडेल… इथून फक्त 10 कोसावर माझ्या वडिलांची फौज आहे,तिथं आपण जाऊया…माझे आबा तुम्हाला मदत करतील…त्यांचा आणि महाराजांचा संबंध खुप जवळचा आहे….मी नेईन सकाळी गुप्त वाटेने तिकडे…तोवर तुम्ही विश्रांती घ्या….मी जरा बाहेर जाऊन येते…!

सखाराम व त्याचे मित्र खूप आनंदले….चला खंडेरायाची कृपा…आता तर सरळ शिर्के सरदार आपल्याला मदत करणार म्हणल्यावर काम झालं….गाव आणी बारा वाड्याच दुःख कायमच संपलं… चला घ्या दर्शन देवाचं आणि झोपा….”

सर्जा, नारायण आणि मल्हारी त्वरित झोपी गेले.
दिवसभर खूप हाल झाले होते त्यांचे…पण मल्हारी …?

त्याला बिलकुल झोप येईना…उलट त्याची विचारचक्रे सुरु झाली होती….!

कोण ह्यो खंडोजी…हे जंगल या आधी आम्हाला का नजरेस पडले नाही, हे मन्दिर जर एवढे पुरातन आहे, तर मग शिवाजी महाराजांसारखा शिवभक्त राजा आजवर इथं येऊन या मंदिराची डागडुजी का केली नाही?

तारुण्याने मुसमुसलेली ही सौंदर्यवाण साऊ इतक्या भीषण काळरात्री एकटी इथं काय करते आहे ?


आणि शिरक्यांची फौज १० कोसावर ?


१० कोसावर तर नुसतं जंगलच आहे….फौज कशी आणि कुठे असेल….!

हे विचार चक्रे चालू असतानाच मंदिरा बाहेर एक जीवघेणी वाघाची डरकाळी सखाराम च्या कानावर पडली आणि दचकून तो उठला…आसपास पहिले पण ते तिघे तर घोरत होते…हिम्मत करुन त्याने त्या खुंटीवर असलेली तलवार घेतली आणि समोर असलेल्या महादेवाच्या पिंडाला नमस्कार करत मनात प्रार्थना केली….”माझ्या देवा…गावासाठी आम्ही जीवावरचा खेळ खेळतोय, तू काय पदरात टाकशील ते खर, फकस्त आमच्या हातून काय चूक होऊ देऊ नगो, तुझा आशीर्वाद नेहमी पाठीशी असावा”

सखाराम तडक मागे फिरला आणि त्या निमुळत्या मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर निघाला….बाहेरनिळसर चांदणे पडले होते, पाऊस बिलकुल नव्हता, झाडांच्या पानावरुन निथळणारे पाणी चेहऱ्यावर झेलत तो बाहेर आला, व वाघाच्या आवाजाचा कानोसा घेत, तो पुढे गेला व पाहतो तर काय ?
वाघाचे ते भयानक धूड रक्ताच्या थारोळ्यात निपचिप मरुन पडले होते……तो त्या वाघाकडे निरखून पाहू लागला, त्याच्या हृदयाची कम्पने वाढली, जो हळू हळू मागे जाणार इतक्यात…पाठीमागून त्याच्या पाठीवर कोणीतरी कोणीतरी हात ठेवला….”

जिवाच्या आकांताने तो ओरडला आणि मागे वळून पाहतो, तर ती साऊ होती…!

दीर्घ श्वास घेत त्याने तिच्याकडे नजर टाकली आणि म्हणाला…खर सांगा बाईसाहेब तुम्ही कोण आहे ?
ह्या वाघाला कुणी मारलं ?
आम्ही गावासाठी हिकडं आलोय…तुम्ही कस काय ऐकलंच हित हाय ?

अस बोलताना भीतीने सखाराम चा घसा कोरडा पडला व अश्रू येऊ लागले…”

स्मितहास्य करत साऊ बोलली….घाबरु नका भाऊ….मी इथं कशी हे ऐकायचं आहे ना तुम्हाला…?

तर मग ऐका……..!

मी “सावित्री येसाजीराव शिर्के”


आदिलशाहीचे नेकजात सरदार राजे येसाजीराव शिरक्याची एकुलती एक मुलगी…….लहानपनापासून हौस मौज करत वाढलेल्या माझ्या आयुष्याला कधी न संपणारे दुःख ज्या हरामखोराने दिले त्याच्यामुळेच मी आज इथे आहे……!

माझ्या साऱ्या जीवनाची कथा मी तुम्हाला सांगते….ऐका आणि मग विश्वास ठेवा न ठेवा तुमची मर्जी……!

यशवंतमाची”हे माझे जन्म गाव…!

क्रमशः बाजींद भाग ४ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव


Comments

Popular posts from this blog

१.महार

महार

भंडारी समाजाचा इतिहास