आम्ही सारे पाताळातील
आम्ही सारे पाताळातील
महाराष्ट्रातील पहिला ज्ञात राजवंश सातवाहन नागवंशीय होता. असे चि. वि. वैद्य व श्री. व्य. केतकर मानतात. पाताळात वितहाच्या खाली सुतल असून तेथे कोकणच्या पुण्योक बळीराजा निवास करतो. तळतळात मय निवास करतो. महातळात कांद्रवेय नामक सर्पाचा गण वास करतो. कद्रुपुत्र येथे सहकुटुंब राहात असत व सर्वात पाताळात खाली शूर असे नागलोक वस्ती करून राहतात, असे पद्मपुराणात वर्णन आहे. सिंधुदुर्ग व गोमंतकातील नागवंशाचा शोध घेता विस्मयकारक कथा समोर येतात.
श्री हर्षकृत नागानंद नाटकाच्या कथा सरित्सागर या ग्रंथाच्या आधारे पाताळ म्हणजे आजचा कोकण किनारपट्टीचा प्रदेश होय हे त्यांनी सिद्ध केले आहे.
महाभारतात उद्योगपर्वामध्ये नागांच्या अनेक कुळांचा उल्लेख आहे. त्यामध्ये कुंकण या कुळाचा उल्लेख झालेला आहे. त्याचेच संस्कृतमध्ये कुंकण कोकण झाले व मराठीत कोकण किंवा कोंकण झाले असे राजवाडे म्हणतात. पाताळाची तल, वितल, अतल, सुतल, महितल, रसातल, पातल ही याच भागातील प्राचीन नावे असून नागवंशीय लोकांपासून मराठा जातीमधील कुलनामे झाली आहेत. असे त्यांचे मत त्यांनी मांडले आहे.
जसे वासुकीपासून वासे, भासे, तक्षकपासून तरवे, तिरवे, कर्कोटकपासून कोकाटे, गोकटे, कालीयपासून-काळीये, काळये काळे, वामनापासून-वामणे, कुकरचे-कुकरे, कुकणचे- कोकणे, नंदकेचे-नंदे, गंदे, कलशचे-कळशे पोतकचे-पोते अशी ३९ कुलनामे त्यांनी सांगितली आहेत. जर ही कुलनामे मराठयांमध्ये आज प्रचलित नसती तर नागजातीचा शोध लावणे अशक्य होते, असे ते म्हणतात.
राजतरंगिणीमध्ये काश्मीरच्या नागराजाचा उल्लेख आहे. यमुनेच्या दक्षिण दिशेस खांडव वनात नागाची वस्ती होती आदिपर्वात उल्लेख आहे. हरिवंशात नागपूर येथे नागांचे वास्तव होते. हे स्पष्ट होते. म्हणजे पांडवांच्या आधीपासून कोकणा व्यतिरिक्त इतर ठिकाणी नागाचे वास्तव्य होते. जनमेयाच्या ‘सर्व सत्रातील युद्धातील आर्यानी नागाच्या केलेल्या कत्तलीमुळे भारतातील इतर प्रदेशातून पांडव आर्य वीरानी त्यांना उत्तर भारतातून दक्षिण भारतात हाकलेले. यात त्यांचे आर्याशी युद्ध झाले व ते कोकणात आले. राजवाडे यांच्या मते कोकण हे नागाचे मूळ वस्तीस्थान. नागांच्या संस्कृतीविषयी गौरवपूर्ण उल्लेख या लेखात आहे.
नागापासून मराठे झाले असे राजवाडे यांनी म्हटले आहे. राजवाडे यांनी शहाजी महाराजांचे चरित्र सांगणारा जयराम पिंडे यांनी रचलेला ‘राधा माधव विलास चंपु’ या ग्रंथात प्रस्तावना लिहून मराठयांची उत्पत्ती सांगितली आहे. ते म्हणतात शके पाचशेच्या सुमारास मराठे म्हणून ज्यांना म्हणतात ते लोक महाराष्ट्रात व नाग यांच्या हजार पाचशे वर्षाच्या संगमापासून महाराष्ट्रात निपजले. हया मराठयांची संस्कृती अर्थात महाराष्ट्री व नाग संस्कृती निराळी नव्हती. दोघांच्या संस्कृ तीचे हे मिश्रण होते असे विधान केले आहे. नाग मुळात हा ग्रंथाचा विषय परंतु लेखात बसविणे हे कठीण काम म्हणून आपण काही संदर्भ बघू या.
ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर म्हणतात. महार व रट्ट लोक यांच्या एकत्रीकरणातून या देशाला नाव महाराष्ट्र प्राप्त झाले. ब्रह्माने सात लोकसंख्या निर्माण केल्या. त्यामध्ये भुर्लोक, भुवर्लोक, स्वर्लोक, महर्लोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक यापैकी चौथ्या क्रमांकावरील महर्लोक म्हणजे महर मानवाचे (महार लोकांचे) वस्तीस्थान असे कोसारे म्हणतात. हे महरलोक त्रलौक्यापेक्षा श्रेष्ठ होते. ते असुराचे अर्थात नागांचे लोकराज्य होते. महर व नाग पर्यायी शब्द आहेत. महार ही मुळात गणवाचक संज्ञा आहे. नंतरच्या काळात महार या शब्दाला ज्ञातीवाचक संज्ञा प्राप्त झाली. पुराणानुसार पाताळ नागांची भूमी असल्याचे स्पष्ट होते.
महर म्हणते मोठा अर्थात नागगणाचे नाव म्हणून महरनाग हा शब्द वापरण्यात आला. महारठीचा प्रदेश म्हणून महारट्ठ म्हणून महाराष्ट्री असे पाकृतान म्हटले जात असे. महाराष्ट्रातील पहिला ज्ञात राजवंश सातवाहन नागवंशीय होता. असे चि. वि. वैद्य व श्री. व्य. केतकर मानतात.
पाताळात वितहाच्या खाली सुतल असून तेथे कोकणचा पुण्योक बळीराजा निवास करतो. तळ तळात मय निवास करतो. महातळात कांद्रवेय नामक सर्पाचा गण वास करतो. कद्रुपुत्र येथे सहकुटुंब राहात असत व सर्वात पाताळात खाली शूर असे नागलोक वस्ती करून राहतात, असे पद्मपुराणात वर्णन आहे.
डॉ. श. दा. पेंडसे यांनी ‘धार्मिक इतिहासाचे सामान्य निरीक्षण’ या व्याख्यानात ते म्हणतात. स्वर्ग, मृत्यू, पाताळासंबंधी सर्वसामान्यांतील कल्पना चुकीच्या आहेत. स्वर्ग म्हणते उत्तरेकडील उंचवटयाचा प्रदेश, मृत्यूलोक म्हणजे उत्तरेकडील मैदानी प्रदेश व पाताळ म्हणजे विंध्याद्रीचा दक्षिणेकडील प्रदेश. स्वर्गात देवांची वस्ती, मृत्यूलोकांत मानव राहात आणि पाताळात नागलोकांची वस्ती.
नाग म्हणजे सर्प नव्हेत. सर्प हे ज्यांचे दैवत असा मनुष्य संघ म्हणजे नाग होत. त्यांच्या मुलीशी उत्तरेकडील क्षत्रियांनी नंतर लग्न ही केली आहेत. श्री पं. श्री. दा. सातवळेकर महाभारत की समालोचन ग्रंथात म्हणतात देव हे आर्यामधील गटाचे नाव. पूर्वी जेथे ते राहात त्याला त्यांनी स्वर्ग नाव दिले. त्रिविष्टपच्या अपभ्रंश तिब्बत आजचे तिबेट येथे त्या काळी राहणा-यांना देव व त्या प्रदेशास देव लोक म्हणत. म्हणून बद्रीकेद्वार, हरिद्वार, गंगोत्री, हिमालयातील या प्रदेशास स्वर्गद्वार म्हणतात.
या बर्फाच्छादित प्रदेशात काही पिकत नसल्याने ते खाली गंगेच्या काठावरील सुपीक प्रदेशात येऊन यज्ञाद्वारे उत्पन्नावर हक्क सांगत. श्रीकिर्ती देव देसाई यांनी पाताळ लोक हा भारताच्या पश्चिम किना-यावर होता याचे संशोधन केले. गुजरात, तापी नदीच्या मुखाजवळचा भाग हा पाताळाशी संबंधित भाग. नर्मदेला नागाची बहीण मानतात. ठाण्यातील सोपारा यास पाताळ म्हणतात. हे सिद्ध झाले आहे.
डॉ. स. ना. कुलकर्णी आपल्या संशोधनात म्हणतात. आर्य प्रेताना अग्निसंस्कार’ करतात व जाळतात पण अनार्थ प्रेते गड्डे (गर्ता) करून पुरतात. त्यामुळे ते गर्तेत पडतात, पाताळात जातात असा अर्थ ध्वनीत होतो. ऋग्वेदात पिशाची हा शब्द आला आहे. त्या भूत, पिशाच ही देवयोनी तील आहेत. हे प्राचीन भूतलोक होते. तसेच पैशाची भाषा ज्याचा एकमेव ग्रंथ, बृहत्कथा आता उपलब्ध नाही.
पूर्वी जी द्रविड भाषा बनली. ती भाषा आर्यपूर्व संपूर्ण भारतीयांची होती व नागद्रविड हे पिशाच्च होते. नाग द्रविड एकच होते. त्यांचे संस्कृती वाचक नाव नाग तर भाषा वाचक नाव द्रविड. डॉ. एच. एल. कोसारे यांनी या वास्तावावर पुराव्यानिशी प्रकाश टाकला आहे. इतिहासाचे अभ्यासक अशोक राणा यांनी या संदर्भात विपुल अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. नाग व कोकणचा संदर्भ यासाठी अनेक ग्रंथकारांनी अभ्यासात्मक लेखन केले आहे. ते मुळातून वाचले पाहिजे. त्यातून अनेक रहस्याचा शोध व बोध आपण घेऊ शकू.
कोकणातील म्हणजेच सिंधुदुर्ग व गोमंतकातील नागवंशाचा शोध घेता विस्मयकारक कथा समोर येतात. गाव-हाटीच्या अभ्यासात सोमवंश आणि नागवंश या दोन महागणानी गाव-हाटी स्थापन केली म्हणतात त्यांची पंचमहाभुतावर पूर्ण सत्ता होती. ते सोज्वळ व सात्त्विक होते. यातील नागवंशाचा महागण हा र्निवश स्वरूपात गाव-हाटीमध्ये कार्यरत असतो. हाच राज सत्तेचा खरा मालक असतो असेही काही संशोधकांचे मत आहे.
कोकणात सर्वसाधारण सर्वच गावात लिंगाचे स्थान असते. या शिवलिंगास स्वयंभू म्हटले जाते. ब-याच शिवलिंगावर पितळी नागफणा असते. सिंधुदुर्गातील माणगाव खो-यातील महादेवाचे केरवडे हे सहयाद्रीच्या पट्टयातील गाव. यास बारापाचाच्या मूळ संप्रदायाचे आद्यस्थान म्हणून ओळखतात. महादेवाचे केरवडे गावाच्या नावाची मूळ शब्द रचना व त्याचा नागवंशाशी असलेला संबंध याचा सविस्तर खुलासा (कोकणातील गाव-हाटी या पुस्तकात मांडला आहे.) नागवंशाशी दुसरा संदर्भ कणकवलीपासून ५ किमी अंतरावरील नागवे गाव.
गावातच नाग शब्द येतो कारण येथील प्रमुख देवता नागेश्वर येथील शिवलिंगावर नागाची फणा धारण केली आहे. पौष महिन्यात चारही सोमवारी येथे नवस फेडण्यास भक्त येतात. नवस फेडणारी व्यक्ती जिभ, हात व केस यांचा वापर करून गाभा-या समोरची जमीन सारवते. येथील मानकरी चंद्रकांत सावंत यांजकडून ही माहिती मिळाली. असाच वेगळा संदर्भ कासार्डे येथे नाग सावंतवाडी किंवा टेंब आहे. येथे ६० ते ७० घरे नाग सावंतांचीच आहेत.
कधी कोणी एके काळी या घराण्यातील पुण्यात्म्यास नागदेवतेचे दर्शन झाले. त्यामुळे सदर सावंत घराण्याने स्वत:च नाग सावंत बिरुद भूषविले. असा आणखी एक संदर्भ जिल्हा केंद्र असलेले ओरोस गाव. येथील प्रसिद्ध गावडे घराणे या घराण्याची मूळ वास्तू म्हणजे ६० खोल्यांचा प्रचंड वाडा. या घराण्यात ब-याच वर्षापासून जिवंत नागांची पूजा व्हायची. नंतर सुवर्णाच्या नागाची पूजा व्हायची. तो काही कारणाने गहाळ झाल्याने सध्या चांदीच्या नागाची पूजा केली जाते. हे संदर्भ नाग वंशाच्या अभ्यासासाठी तपासले पाहिजे. असे अनेक संदर्भ गावोगावी सापडू शकतात. ज्यामुळे नागवंशाचा संशोधनाला गती व पुष्ठी मिळेल.
कोकणातील उपासना पद्धतीत मिथके, श्रद्धा, समजुती यांचा फार पसारा आहे. यातून होते संस्कृतीची जडणघडण. त्यामुळे सांस्कृतिक, लोकजीवन सुद्धा फार विलक्षण व व्यामिश्र. याची मूळही फार कोठे तरी सिंधु संस्कृतीत पोहोचलेली वाटतात. तशीच आहेत. हजारो वर्षे या सर्वाकडे पाहता एक भान येते व आपल्या मनातील अभ्र दूर होऊन पूर्व गृतित क्षृद्रत्व जे निर्माण झाले आहे ते नष्ट होते. मात्र नागवंशाच्या शोधासाठी श्रद्धा विश्वाच्या विवरात पाताळात उतरले पाहिजे. या वारुळात प्रवेश केल्याशिवाय त्या विषयाचा शोध आपल्या कक्षेत येणे दुरापास्त आहे.
एका उच्च संस्कृतीचा इतिहास आपला पाहू शकू. कोकणातील जाती व्यवस्था, देव-देवस्की, गावरहाटी, देव, धर्माचा इतिहास यांच्या अध्ययनाचा संशोधनाला उपयोग होईल व आपण याचे जर मूलगामी संशोधन केलं तर आपल्या साथीने इतिहासाचे साक्षीदार झळाळून निघतील.
Comments
Post a Comment