दलितांचा दलदलित पराभव का होतो!

loksatta.com

दलितांचा दलदलित पराभव का होतो!

♨️प्रत्येक खेळाचे काही नियम असतात आणि ते फक्त त्या त्या खेळापुरतेच लागू असतात. 

👉ते नियम इतर खेळांना लागू करता येत नसतात, म्हणून करावयाचेही नसतात. तसा प्रयत्न केलाच तर संबंधित खेळ आणि खेळकरी दोघेही खलास होतात 

👉आणि राजकारणात हा भारतातील सनातन खेळ आहे. 

👉जगातील बहुतेक देशांमध्ये कुठे ना कुठे विषमता संपवून समता आणली गेली. पण भारतात विविध पातळ्यांवर विषमता कळत नकळत राबविली जाण्याचेच राजकारण असल्याने भारतीय राजकारणाच्या खेळाचे नियमही सतत नवनवोन्मेषशालिनी राहिले आहेत. 

👉ही परंपरा वैदिक कालापासून असून महाभारत हे त्याचे ठळक उदाहरण आहे.

👉सतत नवा आविष्कार घडविणाऱ्या भारतीय राजकारण या एकाच खेळघराच्या नियमात स्थलकाल बदलले की, नियमांचे प्रारूप आणि उपाययोजनही बदलले जाते. याचा पुरावा महाराष्ट्रात रामदास आठवले यांच्या दारूण व करुण पराभवाने अतिशय ठळकपणे जाणवतो.

♨️ प्राचीन काळापासून दलितांचा अनेक आघाडय़ांवर नेहमीच दणदणीत नव्हे तर दलदलित पराभव होत आला, पण तो का होतो? विशेषत: आजच्या आधुनिक लोकशाही काळात का होतो? 

👉याचा मात्र विचार होत नाही. झाला पाहिजे त्याची कारणं अनेक असली तरी दलितांनीच केलेली तुकडीकरणाची दलदल हे मुख्य कारण आहे.

👉आठवलेंचा पराभव हा महाराष्ट्राचाच नव्हे तर दलितांच्या देश पातळीवरील पराभवाचा प्रातिनिधिक पुरावा मानावा इतका व्यापक आहे.

 👉भारतात मतदारसंघाची विभागणी वर्ण, जात, वर्ग वर्चस्ववादी असली तरच उमेदवार निश्चित यश मिळवू शकतो. 

हे यशाचे सूत्र आठवलेंच्या निमित्ताने सिद्ध होते, पण उलटय़ा अर्थाने. 

👉एखादा मतदारसंघ केवळ राखीव केला किंवा खुला केला म्हणून त्या संबंधित जातीधर्माचा उमेदवार निवडून येईल, असे नसते. म्हणूनच ‘रामदास आठवलेंचा पराभव म्हणजे समाज प्रबोधनाचा पराभव’ ही समीक्षा फारच उथळ होईल.

 ही समीक्षा आधुनिक रीतीने करण्याऐवजी पारंपरिक पद्धतीने केली तर कदाचित आधुनिक जाण विकसित होईल.
खरे तर अहमदनगर जिल्हा परंपरेने काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मग सर्वार्थाने काँग्रेसनिष्ठ असणाऱ्या प्रेमानंद रुपवते यांना डावलून रामदास आठवले यांना काँग्रेसने उसने घेणे हे स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांना आणि मतदारांना मान्य का व्हावे? आता काय झाले पाहा. प्रथम रुपवतेंना डावलण्याचा अन्याय झाला. मग आठवले यांनाही चुकीचा मतदारसंघ देण्याचा अन्याय केला गेला. या व्यक्तिगत अन्यायासोबत जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांवरही चुकीचा उमेदवार साधण्याचा सार्वजनिक व सामूहिक अन्याय झाला. काँग्रेस राष्ट्रवादीचे परस्पर कुरघोडीचे राजकारण हाही अन्यायाचा मसालेदार आविष्कार त्यात फोडणीला दिला गेला आणि संपूर्ण सत्तानाशाच्या निमित्तकारणाची भूमिका दलितांमधील अंतर्गत फुटी, तुकडीकरण यांनी केली. यात काँग्रेसनिष्ठ दलित मतदारांची व कार्यकर्त्यांची ससेहोलपट झाली. त्यांना कुणी वालीच उरला नाही!
या सगळ्यांना धडा देण्यासाठी शिक्षा म्हणूनच भाऊसाहेब वाकचोरे यांची निवड जनतेने केली. भाऊसाहेब वाकचोरे हे नुकताच काँग्रेसचा मांडव सोडलेले. म्हणजे माजी काँग्रेसवालेच! त्यामुळे त्यांना कौल देऊन काँग्रेसला मत देण्याची मतदारांची इच्छाही पूर्ण झाली आणि आठवलेंना पाडून काँग्रेसला थेट धडा शिकविण्याची इच्छाही सफळ झाली.या राजकीय मानसिकतेत आणखी एका प्राचीन मानसिकतेने चांगलीच कामगिरी बजावली. ती वर्णजाती अंतर्गत उतरंडीच्या अस्मितेची आहे. त्यासाठी दलित शब्दाचा अन्वयार्थ पाहू.
दलित शब्दाचा अर्थ व व्युत्पत्ति अलीकडील कोणत्याही शब्दकोशात दिलेली नाही. दलित ही घटनाच विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अस्तित्वात आली. पीडित, शोषित, अवमानित, उद्ध्वस्त, भग्न अशा व्यक्तींच्या, व्यक्तिसमूहाच्या संदर्भात ‘दलित’ हे विशेषण वापरले जाते. ‘दलित्स इन मॉडर्न इंडिया’च्या प्रस्तावनेत एस. ए. मायकेल यांनी ‘दलित’ या शब्दाचे अनटचेबल्स, हरिजन, डिप्रेस्ड क्लासेस, आऊटकास्ट, चांडाल, अवर्ण, पंचम, निषाद, अंत्यज, अतिशूद्र इत्यादी अर्थ दिले आहेत. डॉ. आंबेडकरांनी ‘ब्रोकन मेन’ हा शब्द १९३१ मध्ये वापरला.
‘दलित’ हा शब्द मराठीत ‘पददलित’चा संक्षेप म्हणून आला असून तो इंग्रजीतीलीिस्र्१ी२२ीचिा अनुवाद करून उसना घेतलेला आहे. संस्कृत ‘दल्’ धातूचा अर्थ ‘फुटणं’. तो सकर्मक झाला की अर्थ होतो ‘फोडणं’. मराठीत त्यावरूनच ‘दळणं’ हे सकर्मक क्रियापद आले आहे.
‘दलित’ या शब्दास पँथरच्या चळवळीत विशेष वजन आले. त्यामुळे आधीचा हीनभाव नाहिसा होऊन एक संघटित वर्ग आणि त्याने चालविलेली समतेची चळवळ’ असा अर्थ त्यास आला. ‘दलित’ ही राजकीय जाणीव, अस्मिता, चलन, वास्तव, पर्याय, समांतर संस्कृती इत्यादी अर्थाची आशयघनता प्राप्त करते. हे झाले तत्त्वज्ञान. पण वास्तव काय तर?
दलित म्हणजे ज्याचे दल, म्हणजे तुकडे करता येतील असा वर्ग! हा अर्थ आणि आशय दलित नेत्यांनीच आणला आहे. अगदी ‘किरकोळ कारणावरून सुद्धा तुकडे करता येणारा’ हा नवा अर्थ सिद्ध करण्याचाच प्रयत्न दलित पक्षाच्या सततच्या तुकडीकरणातून दुर्दैवाने व्यक्त होतो. बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘संघटित व्हा’च्या सम्यक्च्या पूर्ण विरोधी!
उदाहरणार्थ आज महार नवबौद्धांनी ‘दलित’ शब्दाचा कब्जा घेतलेला आहे. अण्णाभाऊ साठे मांग आणि मार्क्‍सवादी, कवी ग्रेस जातीने महार पण ‘दलित जाणीववाले’ नाहीत.
खरे तर आठवले आणि वाक्चौरे (व रुपवतेही) दलित नेते. रामदास आठवले हे नवबौद्ध महार जातीचे तर भाऊसाहेब वाकचौरे हे चांभार जातीचे आहेत. परिणामी शिर्डीमधील हे युद्ध पक्षांमधील नव्हते तर दलित जातींमधील उच्चनीचतेचे युद्ध ठरले. ही लढाई मुख्यत: जातीअंतर्गत उतरंडीमधील संघर्षांची आहे. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. जातीच्या उतरंडीत महार जात ही नेहमीच निम्नदर्जाची व अस्पृश्य राहिली. तर चांभार ही जात अस्पृश्य असली तरी ती जातीय उतरंडीत वरची मानली जाते. मग चांभार दलित कसे ठरतील?
परिणामी वर्णजातीअंतर्गत उतरंडीच्या अस्मितेने बाजी मारली. ‘वरच्या पुढे माथा आणि खालच्याला लाथा’ या वर्णजातीच्या व्यवस्थापनाच्या सनातन सूत्रानेच येथे काम केले. आठवले-वाकचौरे निवडीत ‘महारापेक्षा चांभार बरा’ संदेश सर्वत्र रातोरात गेला. म्हणूनच आठवलेंचा पराभव हा जसा काँग्रेसचा पराभव नाही तसा भाऊसाहेब वाकचौरेचा विजय भाजप-सेनेचा विजय नाही. (कारण कालपर्यंतच वाकचौरे काँग्रेसमध्येच होते.)
आठवलेंच्या पराभवाला (खरे तर वाकचौरेंच्या विजयाला) खतपाणी मिळाले ते नवबौद्ध महार जातीने सहज मिळविलेल्या तालेवारी जीवनव्यवस्थेने! या नवजागृत तालेवारी मानसिकतेनेच त्यांचा घात केला आहे. वस्तुत: तालेवारी मानसिकता पूर्वीपासूनच आदराला अपात्र आणि सामाजिक अभिसरणाला निरुपयोगी ठरत आलेली आहे. ही नवतालेवारी पराभूत रामदास आठवले आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांच्या वागणुकीत तसेच वक्तव्यांमधून यथार्थतेने दिसून येते.
‘मला देतील त्या मतदारसंघात मी जाईन’ हे या आधुनिक रामदासाचे उद्गार त्यांची ना मतदारसंघाची एकनिष्ठा प्रगट करतात ना दलितांविषयी खरी यथार्थ आस्था!’ ‘मला राज्यसभेवर निवडून न दिल्यास विधानसभा निवडणुकीत हिसका दाखवू’, ‘कोणत्याही परिस्थितीत मला घ्याच’ हे पराभवानंतरचे रामदासांचे उद्गार केवळ आत्मप्रेम, स्वार्थ स्पष्ट करणारे आहेत. असे कुणी म्हटल्यास ते चूक होणार नाही. दलितांमधील इतर पात्र, बुद्धिमान, राजकीय क्षमता असणाऱ्या सुशिक्षितांबद्दल विचार करण्याची रामदासांना गरजच भासत नाही.
‘कसेही करून मी निवडला गेलोच पाहिजे’, हे त्यांचे म्हणणे सोनिया गांधींसह बाळासाहेब विखे, बाळासाहेब थोरात, शरद पवार, आदिक, पिचड इत्यादींना ब्लॅकमेलिंग करणेच आहे, असे म्हटले पाहिजे. आठवलेंचा पराभव झाल्यामुळे ‘आता अ‍ॅट्रोसिटी काय असते तेच आम्ही दाखवतो’ या आठवलेंच्या प्रचारक कार्यकर्त्यांच्या उद्गारातूनही हीच मानसिकताच विस्तृतपणे जाणवते. एवढेच नव्हे तर महात्मा गौतम बुद्ध, खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दलित चळवळ आणि दलित जनता यांनाही वेठीला धरण्याची मानसिकताच या अशा प्रकारच्या वक्तव्यांमधून प्रगट होते.
अ‍ॅट्रोसिटीचा कायदा समतापूर्ण सामाजिक रचनेसाठीचा आपद्धर्म आहे. व्यक्तिगत स्वार्थासाठी त्याचा हत्यार म्हणून वापर करण्याने संदेश विकृत होतो. आठवले + त्यांच्या कार्यकर्त्यांची कृती व वक्तव्यांमार्फत जनतेच्या वर्णजातीवादी मानसिकतेवर फुंकर घालून विविध पातळ्यांवरील भेदविषमतेलाच व्यापक अवकाश उपलब्ध होण्यासारखेच आहे; याचे भानच ही मंडळी विकसित करीत नाहीत, असे दिसून येते. एकूण परिणाम म्हणून ‘‘बरं झालं यांना निवडून नाही दिलं’’ ही भावना उच्चवर्णीयांना आणि जातीअंतर्गत महारसापेक्ष उच्चजातींमध्ये जागी होणे, हाच समाजप्रबोधनाचा पराभव मानता येईल. पण लक्षात कोण घेतो?
श्रीनिवास हेमाडे
madshri1@gmail.com


Comments

Popular posts from this blog

१.महार

महार

भंडारी समाजाचा इतिहास